बांदा शहरात वाहनांची कसून तपासणी करताना पोलिस कर्मचारी.  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Banda City Police Blockade | बांदा शहरात पोलिसांची अचानक नाकाबंदी

सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली अचानक नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

बांदा : वाढत्या चोरीच्या घटना आणि दिवसेंदिवस वाढत असलेला गुन्हेगारीचा धोका लक्षात घेता, बांदा शहरातील नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी बांदा पोलिस ठाण्याच्या वतीने कडक पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली अचानक नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दुचाकी चोरी, घरफोडी, दुकानफोडी अशा प्रकारच्या घटना वाढल्यामुळे व्यापारी, नागरिक यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील सराफ व्यावसायिकांची पोलिसांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत व्यापार्‍यांनी बाजारपेठ व गर्दीच्या भागात गस्त वाढविण्याची मागणी केली होती.

बांदा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमावर्ती शहर असल्यामुळे येथे गोवा आणि कर्नाटकातून अनेक परप्रांतीय व्यापारी, कामगार, तसेच अनोळखी व्यक्ती मोठ्या संख्येने येत असतात. याचा गैरफायदा घेत काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चोरी, फसवणूक, लूटमारीसारख्या घटना घडवू शकतात, अशी शक्यता पोलिस प्रशासनाने व्यक्त केली आहे.

शनिवारी सकाळी अचानक करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान निरीक्षक पालवे, वाहतूक पोलिस शेखर मुणगेकर आणि इतर पोलिस कर्मचारी बांदेश्वर मंदिर रस्त्यावर तैनात होते.

गोव्यातून येणारी वाहने, चारचाकी, दुचाकी, ट्रक यांची कसून तपासणी करण्यात आली. संशयास्पद व्यक्तींची कसून झडती घेऊन ओळखपत्रे तपासण्यात आली. अनेक वाहनचालकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही आढळून आले. काहींवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य केले. नाकाबंदीमुळे काही काळ वाहतूक खोळंबली असली तरी चोरी व गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल नागरिकांनी स्वागतार्ह असल्याचे सांगितले.

पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी नागरिकांना आवाहन केले की, अनोळखी व्यक्ती, संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच नागरिकांनी आपल्या घरांमध्ये, दुकानांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी आणि सावधगिरी बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.

पोलिसांकडून आगामी काळात शहरातील विविध ठिकाणी अशा प्रकारच्या अचानक नाकाबंदी मोहीमा राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT