सावंतवाडी : काजूला प्रतिकिलो १० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. २७९ कोटी रुपयांचे अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावा. जीएसटी अट शिथिल करून गुमास्ता परवाना असलेल्या काजू व्यापाऱ्याच्या खरेदी पावतीवर अनुदान देण्यासाठी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याची चर्चा केली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करावे, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काजू बागायतदारांशी चर्चा करताना सांगितले.
प्रांताधिकारी कार्यालयासमोर शेतकरी ठिय्या आंदोलनाला बसले होते. त्यांची भेट मंत्री दीपक केसरकर यांनी घेत चर्चा केली. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, जयप्रकाश चमणकर, संजय देसाई, सुरेश गावडे, दिवाकर म्हाळवणकर, प्रवीण परब, आकाश नरसुले, भीमराव देसाई, विश्वनाथ राऊळ, संजय लाड, विष्णू सावंत, उल्हास देसाई, शांताराम गावडे, प्रदीप सावंत, जगदेव गवस, कृष्णाजी कोठावळे व शेतकरी उपस्थित होते
काजू बागायतदारांनी जीएसटी अट शिथिल करून अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी केली होती. तसेच समाईक जमिनीमधील लाभार्थीचे हमीपत्र घेण्याचा निर्णय यापूर्वीच केसरकर यांनी मंजूर करून घेतला आहे. बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडणाऱ्या बागायतदारांना भेटून मंत्री दीपक केसरकर यांनी जीएसटी अट शिथिल होईल असे सांगून गुमास्ता परवाना असलेल्या काजू व्यापाऱ्याची खरेदी पावतीवर अनुदान मंजूर केले जाईल, असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आश्वासन दिले असून तसे पत्रही दिले असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.