जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे 
सिंधुदुर्ग

Trupti Dhodmise : दुबार मतदार आढळल्यास कडक कारवाई!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे : जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत अशा सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले आणि कणकवली अश्या चार स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून 74 मतदान केंद्रांवर निवडणूक शांततेत पार पडेल यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. दुबार मतदान करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता पोलिस प्रशासन आणि निवडणूक प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, त्या दृष्टीने गुलाबी व आदर्श मतदान कक्ष करण्याची तयारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती व राजकीय लोकप्रतिनिधींना माहिती मार्गदर्शन देण्यात येत आहे. दोन किंवा तीन ठिकाणी मतदारयादीत नावे आहेत, अशी 557 नावे आढळली आहेत, अशा व्यक्तींकडून खात्री करून दुबार मतदान होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिषद सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी विनायक आऊंदकर आदींसह उपस्थित होते.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणूक कार्यक्रमांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कणकवली, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या चार नगरपंचायत व नगरपरिषदेचा समावेश आहे. या चारही नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये 74 मतदान केंद्र असून 57 हजार 207 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 27 हजार 897 पुरुष व 29 हजार 510महिला मतदारांचा समावेश आहे. सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये 21 मतदान केंद्रावर 9411 पुरुष व 10 हजार 018 महिला अशा 19 हजार 429 मतदारांचा समावेश आहे. मालवण नगर परिषदेत वीस मतदान केंद्र असून तेथे 6982 पुरुष, 7403 महिला असे एकूण 14 हजार 385 मतदारांचा समावेश आहे. वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीत 16 मतदान केंद्रांवर 4871 पुरुष तर 5244 महिला असे 10 हजार 115 मतदार आहेत. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत 17 मतदान केंद्रांवर 6433 पुरुष, 6845 महिला असे 13 हजार 274 एकूण मतदार आहेत.

जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत अशा चार निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून संबंधित अधिकार्‍यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासन यांची ही बैठक झाली असून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन उपलब्ध झाल्या असून त्याचे स्कॅनिंग करून तयारी पूर्ण केली आहे. संबंधित नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणूक अधिकार्‍यांना कर्मचारी नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या बैठकाही झाल्या. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शस्त्रे जमा करण्याबाबत पोलिस प्रशासनामार्फत हालचाली सुरू असून या निवडणुका शांततेत पार पडाव्यात या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

चारही नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील 275 व्यक्तींची दोन किंवा तीन ठिकाणी 557 नावे आढळली असून संबंधित मतदारांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी मतदान करणार त्या ठिकाणचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर दुबार मतदारांची चिन्हांकित, तारांकीत करून संबंधित केंद्रप्रमुख कर्मचार्‍यांना याची प्रशिक्षण कालावधीत माहिती दिली जाईल. दुबार मतदान करताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यादृष्टीने जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्यानुसार योग्य ती माहिती जिल्हास्तरावर आणि त्या त्या निवडणूक अधिकार्‍यांमार्फत आपल्याकडे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पुरविली जाईल. सिंधुदुर्गातील चार नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी 74 मतदान केंद्रामध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नसून सद्यपरिस्थिती लक्षात घेऊन त्या दृष्टीने पोलिस आणि महसूल प्रशासन लक्ष ठेवू नये प्रतिबंधात्मक कारवाई गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना त्या दृष्टीने पोलिस प्रशासनामार्फत नोटीस दिल्या जाणार आहेत.

निवडणूक लढविणार्‍या ‘क’ वर्ग नगरपंचायतीमधील नगराध्यक्षाला 7 लाख 50 हजार तर नगरसेवकाला 2 लाख 50 हजार नगरपंचायत क्षेत्रातील नगराध्यक्षाला 6 लाख आणि नगरसेवकाला 2 लाख 25 हजार रू. अशी खर्चाची मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत संबंधित उमेदवारांनी निवडणूक केंद्रावर एक किंवा दोन वेळाच जाण्याची मुभा असून माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रांवर भेटी देण्यासाठी प्राधिकृत पत्र देण्यात येणार आहे. त्यामध्ये शासनाने अधिगृहीत वृत्तपत्राच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार्‍या या चार नगरपरिषद नगरपंचायत निवडणूकसाठी जिल्हा प्रशासन आणि नगरपरिषद पंचायत प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक ती टप्प्याटप्प्याने प्राप्त होणारी माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून सादर केली जाईल. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास दिल्या जातील असेही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT