बांदा ः बांदा शहरात फिरणारे भटके कुत्रे अचानक गायब झाले आहेत. शहरातील जि. प. शाळा ते कट्टा परिसरात हमखास दिसणारे भटके कुत्रे अचानक बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या भटक्या कुत्र्यांना गायब करणारे अज्ञात इसम कोण? व या कुत्र्यांचे पुढे काय झाले? असा सवाल बांदा शहरातील नागरिक करत आहेत.
बांदा शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. जि. प. शाळा ते कट्टा परिसरात या कुत्र्यांचा सातत्याने वावर असतो.मात्र 26 जुलै पासून हे कुत्रे अचानक दिसेनासे झाले. या कुत्र्यांना अन्नावाटे विषबाधा करून अथवा गुंगीचे औषध देवून दूरवर सोडण्यात आले असावे किंवा त्यांना मारुन काही रेस्टॉरन्टमधील मटण भेसळ साठी तस्करी केली गेली असावी असा संशय प्राणी प्रेमींमधून व्यक्त केला जात आहे. याबाबत बांदा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिस त्या इसमांचा शोध घेत आहेत. या घटनेला काही प्राणी कल्याण संस्थांनी देखील दुजोरा दर्शवत अशा घटनांना विरोध केला आहे. प्राणी प्रतिबंधक कायद्यानुसार जनावरांची जागा बदलणे,त्यांचे अपहरण करणे किंवा तस्करी करणे हा दंडनीय अपराध असून त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल होवू शकतो.पाच वर्षांपर्यंत अजामीन पात्र शिक्षा होवू शकते. अशा घटनांविरोधात आवाज उठविण्यासाठी प्राणी कल्याण संस्था,प्राणी मित्र तर पिपल्स फॉर अॅनिमल्स या संस्थेमार्फत दिल्लीपर्यंत आवाज उठविण्यात आला आहे.