Stray dog attack Pudhari
सिंधुदुर्ग

Stray dog attack| सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांची दहशत!

एकाच दिवसात घेतला २५ जणांना चावा घेतल्याने नागरिक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता जीवघेणा ठरू लागला आहे. शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळील बांदेकर खानावळ परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल २५ नागरिकांचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली.

या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण असून, पालिकेच्या ढिम्म कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करण्यात येणार असून चावा घेणाऱ्या कुत्र्याला जेरबंद करण्यात आल्याचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी सांगितले.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर हल्ला

या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शहरातील प्रसिद्ध बिल्डर दिनेश नागवेकर यांनाही चावा घेत या कुत्र्याने त्यांना गंभीर जखमी केले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही वेळ आल्याचा आरोप करत श्री. नागवेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी नगरपरिषद प्रशासन आणि कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या संबंधित गृहनिर्माण संस्थेविरोधात पोलिसात तक्रार करण्याचे ठरवले असून, १ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बांदेकर खानावळ परिसरात एक कुत्रा अत्यंत आक्रमक झाला होता. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केले. अखेर या कुत्र्याने समोर येणाऱ्या प्रत्येकावर हल्ला चढवला. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे आणि पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे अशा प्रकारांमुळे नागरिक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत.

एकाच दिवसात घेतला २५ जणांना चावा : "सदर काळ्या रंगाच्या आणि गळ्यामध्ये पट्टा बांधलेल्या हल्ला करणाऱ्या या कुत्र्याला जेरबंद करून पालिकेच्या सीमेवर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. नागरिकांनी आता घाबरण्याचे कारण नाही. आगामी सर्वसाधारण सभेत भटक्या कुत्र्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी विशेष ठराव मंजूर केला जाईल."
- अॅड. अनिल निरवडेकर, प्रभारी नगराध्यक्ष - सावंतवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT