वेंगुर्ले : कलावलय ही संस्था सलग २८ वर्षे नाट्य चळवळ राबवत आहे. येथील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन हे भूषणावह असून अशा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा राबवून प्रा.यरनाळकर यांच्या आठवणींचा-स्मृतींचा जागर यातून निश्चित होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी नंदकुमार पाटील यांनी वेंगुर्ले (शुक्रवारी दि.१०) येथे आयोजित खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कलावलय संस्था वेंगुर्ले व बी.के.सी. असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह येथे आयोजित तीन दिवसीय (१० ते १२ जानेवारी) स्व. प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी नंदकुमार पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी ते बोलत होते. वेंगुर्ले सारखे नाट्यगृह सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही, असे सांगून त्यांनी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचे विशेष कौतुक केले.
वेंगुर्ले मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. वेंगुर्ले नगरपरिषदेचे नाव राज्यस्तरावर झळकत आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेने उभारलेल्या भव्य वास्तू कलावलय ही संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचे काम करीत आहे, असे यावेळी मुख्याधिकारी परिपोष कंकाळ यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कलाक्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल कै. राजीव शिंदे स्मृती कलावलय नाट्यगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नाट्यकर्मी नंदकुमार पाटील यांचा ५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी नाट्यक्षेत्रात योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील लेखक केदार देसाई (कुडाळ), ललित लेखकार प्रसाद खानोलकर ( कुडाळ), सुहास प्रभूखानोलकर, विजय चव्हाण ( मालवण), ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद म्हापणकर ( मालवण), वैशाली पंडित ( मालवण), पद्मा फातर्फेकर, राजेंद्र चव्हाण, ऑडिटर राकेश धर्णे यांचा शाल , श्रीफळ , स्मृतिचिन्ह , रोप देऊन सन्मान करण्यात आला. कलावलयचे सदस्य चतुर पार्सेकर , सीमा मराठे यांना रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप उर्फ राजन गिरप, कलावलयचे अध्यक्ष बाळू खांबकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर , कलावलयचे प्रकाश परब, बी.के.सी. असोसिएशनचे सतीश डूबळे, परीक्षक तुषार भद्रे ,परीक्षक सुनील गुरव , स्वीटी यरनाळकर, जितेंद्र वजराटकर, पंकज शिरसाट , शशांक मराठे , सीमा मराठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मराठे यांनी केले तर अॅड. शशांक मराठे यांनी आभार मानले.