दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीची मासिक सभा वादळी ठरली. या सभेत प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वारंवार सूचना देऊनही अनेक खातेप्रमुख गैरहजर राहिल्याने सभागृहात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.
सभापती पार्वती गवस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत कृषी, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन आणि वनविभागातील प्रलंबित कामांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. उपसभापती गणेशप्रसाद गवस यांच्यासह सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली व जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांमुळेच कामे रखडत असल्याचा थेट आरोप केला. विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सलग बैठकांना दांडी मारल्याने संताप अधिकच वाढला. सदस्य संजय साताडेकर, नेहा गवस, सोनिया कुबल, सायली निंबाळकर, सहा. गटविकास अधिकारी यशवंत गवस उपस्थित होते.
कोळझर येथील २७ लाखांच्या बंधाऱ्याच्या कामात चुकीचे अंदाजपत्रक तयार केल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रत्यक्ष पाहणीशिवाय केवळ कागदोपत्री कामे केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. यावर ७ मे रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरले. कृषी विभागाच्या आढाव्यातही सदस्यांनी कडक भूमिका घेत पावसाळ्यापूर्वी बी-बियाणे व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश दिले. महाडीबीटी, एकात्मिक यांत्रिकीकरण आणि शेततळ्यांच्या अनुदान योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला.
तालुक्यात आठ शाळा शून्य शिक्षकी
शिक्षण विभागाच्या बाबतीत 'शून्य शिक्षकी' शाळांचा प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले. आठ शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. अतिरिक्त २८ शिक्षकांचे तातडीने समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
निधीअभावी जलजीवन ठप्प
जलजीवन मिशनअंतर्गत निधीअभावी कामे रखडल्याचे स्पष्ट झाले. ठेकेदारांना वेळेवर बिले न मिळाल्याने अनेक पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याचा मुद्दा पुढे आला. तेरवण-मेढे योजनेतील पाणीटंचाईवर उपाय म्हणून बोअरिंगची मागणीही करण्यात आली. वनविभागाकडून हत्ती प्रश्नावर उपाययोजना, दुर्गम भागात सोलर लाईट आणि वीज वितरण विभागाने जीर्ण पोल बदलण्याच्या सूचना संबंधित विभागाला करण्यात आल्या.
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करा
गैरहजर अधिकाऱ्यांमुळे चिडलेल्या सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण झालीच पाहिजेत असा स्पष्ट इशारा दिल्याने ही सभा चांगलीच तापलेली पाहायला मिळाली.
सभापती आपल्या दारी
सभापती पार्वती गवस यांनी "सभापती आपल्या दारी" हा उपक्रम जाहीर करत थेट गावपातळीवर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा निर्णय घेतला. तसेच घरकुल, महिला बचत गट, अवैध धंदे आणि पर्यटनस्थळांवरील सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.