सावंतवाडी ः कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवनवाहिनी आहे, तिचे सावंतवाडी येथील परिपूर्ण टर्मिनस गेले दशकभर केवळ कागदावरच आहे. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच हे एक ‘प्रलंबित स्वप्न’ बनले आहे. तरीही यंदा गणेशोत्सवात रेल्वे प्रशासनाने केलेल्या विशेष नियोजनामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, भविष्यासाठी आशेचा एक किरण दिसू लागला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने अंदाजे 380 विशेष रेल्वे फेर्या चालवून एक नवा आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे यातील बहुतांश गाड्या कोकण-मर्यादित किंबहुना खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडी मर्यादित असल्याने परराज्यातील प्रवाशांची गर्दी या गाड्यांमध्ये नव्हती त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार ही रोखला गेला. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने बहुतांश गाड्या ह्या तळकोकणापर्यंत म्हणजेच सावंतवाडी पर्यंत चालवल्या ज्यामुळे कोकणवासी चाकरमान्यांना कोकणातील प्रत्येक तालुक्यातील भागात जाण्यासाठी रेल्वेची सोय मिळाली. आणि यातूनच सावंतवाडी येथे परिपूर्ण टर्मिनस व कोचिंग डेपो असावा हे अधोरेखित झाले.
कोकणची लोकप्रिय 11003/4 दादर ते सावंतवाडी धावणारी ‘तुतारी एक्स्प्रेस’ अजूनही जुने आयसीएफ कोचने धावत आहे. परंतु अधिक सुरक्षित आणि आरामदायक असलेल्या एलएचबी कोच या गाडीला द्यावे, अशी मागणी कोकणातील प्रवासी करत आहेत. रेल्वे प्रशासनाने 2023-24 आणि 2024-25 मध्ये हे अपग्रेड करण्याची घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. यंदाच्या वर्षी सर्व गणेशोत्सव विशेष गाड्या ह्या जुन्या खउऋ डब्ब्यांनेच धावत आहेत हे कुठेतरी कोकणवासीयांना समजणारे नाही.
गणेशोत्सव म्हणजे केवळ सण नव्हे, तर तो कोकणवासीयांसाठी एक उत्सव आहे. कोकण रेल्वेने या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. यावर्षी खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या प्रमुख रेल्वे स्थानकांवर स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी निःशुल्क व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमामुळ प्रवाशांना कोकणची लोककला जवळून अनुभवण्याची संधी मिळत आहे. तसेच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांचेही मनोधैर्य वाढले आहे. याबद्दल स्थानिक कलाकारांनी कोकण रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. े. स्थानक परिसरात विशेष सेल्फी पॉइंट्स, आकर्षक विद्युत रोषणाई, कलात्मक रांगोळी आणि पूजा साहित्य स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामुळे स्थानकांवर गणेशोत्सवाचे चैतन्य ओसंडून वाहत आहे.
या गणेशोत्सवात पुण्याहून तळकोकणाकडे जाणार्या चाकरमान्यांची मोठी निराशा झाली. गणेशोत्सवासाठी पुण्यावरून तळकोकणासाठी एकही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने पुणे आणि परिसरात राहणारे कोकणवासीय नाराज झाले आहेत.