कुडाळ : मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी कुडाळ एसटी आगार सज्ज झाले आहे. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी सोमवार 9 व मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.) कुडाळ आगारातर्फे जादा बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी 24 एसटी बसेस तैनात करण्यात आल्या असून, सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वा. पासून कुडाळ बसस्थानकासह कसाल, पांग्रड, निरूखे, पणदूर या भागातून ही जादा आंगणेवाडी यात्रा स्पेशल बससेवा उपलब्ध आहे. सुमारे 38 हून अधिक बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कुडाळ आगार प्रमुख रोहित नाईक यांनी दिली.
आंगणेवाडी यात्रा स्पेशल बससेवेसाठी वेंगुर्ले आगाराच्या 10 एसटी बसेस कुडाळ आगार प्रशासनाकडून मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुडाळ आगारातून एकूण 24 एसटी बसेस यात्रोत्सवासाठी तैनात ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जादा बससेवेचे प्रमुख मार्ग पुढीलप्रमाणे : कुडाळ- नेरूरपार -काळसे पेंडूर- कट्टा- कुमामे -गोळवण -वडाचापाट मसदेतिठा बागायत- आंगणेवाडी, कसाल-हिवाळे-विरण-पोईप- मसदेतिठा-आंगणेवाडी, कसाल-खोटले- वायंगवडे-आंगणेवाडी, कसाल-हेदुळफाटा-खोटले-रवळनाथ मंदीर-वायंगवडे-धनगरवाडी-पोईप-मसदे स्कूल-बागायतमार्गे आंगणेवाडी, पांग्रड-कडावल-पणदूर-आंगणेवाडी, निरूखे- कडावल- पणदूर- आंगणेवाडी, पणदूर- ओरोस- आंगणेवाडी आदी मार्गांचा समावेश आहे. तसेच आवश्यकतेनुसार ज्यादा बसगाड्या सोडण्यात येणार असून, जत्रोत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी एस.टी. प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या जादा एस.टी. बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळ आगार प्रमुख रोहीत नाईक यांनी केले आहे.