कुडाळ ः मुंबई-गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे सुरू बॉक्सवेलच्या कामामुळे वाहनधारकांबरोबरच स्थानिक शेतकर्यांची त्रेधातिरपट उडाली आहे. ठेकेदाराने झाराफ भावई मंदिर रस्त्यानजीक मोरीच्या ठिकाणीच मातीचे डम्पिंग केल्याने शेतातील पाणी निचर्याचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे शेतमळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून हे पाणी लगतच्या घरांपर्यंत गेले. अखेर याबाबत स्थानिकांनी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर मोरीचा एक पाईप मोकळा करून पाणी प्रवाहित करण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गावर झारा झिरो पॉईंट येथे बॉक्सवेलचे काम सुरू गेले दोन वर्ष हे काम सुरू आहे. अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहन धारकांबरोबरच स्थानिक शेतकरी व जमीन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या कामामुळे शेतातील पाणी निचर्याचे मार्ग बंद झाले आहेत. असाच एक पाण्याचा मोठा प्रवाह झाराप श्री देवी भावई मंदिर रस्त्या नजीक असून, त्या ठिकाणी पाणी पलीकडे जाण्यासाठी मोरी आहे. या मोरीसाठी एकूण चार पाईप बसविण्यात आले आहेत. मात्र, ठेकेदार कंपनीने बॉक्सवेवला भराव घालण्यासाठी लागणारी मातीचे डम्पिंग या ठिकाणी केले आहे. या मातीखाली ही मोरी गाडली गेली आहे.
याबाबत 13 मे पासून स्थानिक लोकांनी संबंधित प्रशासन व ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधले. मात्र, ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. अखेर पहिल्या पावसात ठेकेदार कंपनीचा हा कारनामा उघड झाला. गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे निर्माण झालेला पाण्याचा प्रवाह ढिगार्यामुळे अडला गेला. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. हे साचलेले पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचले. यानंतर लोकांनी पुन्हा एकदा आवाज उठवल्यानंतर ठेकेदाराने थोडीशी माती बाजूला करून चार पैकी केवळ एक पाईप मोकळा केला. यामुळे पाण्याचा निचरा झाला.
या ठिकाणी सर्व शेतातील सर्व पाणी एकत्र येते. अशा स्थितीत एक किंवा दोन पाईप मोकळे करून पाण्याचा जलद निचरा होणार नाही. येत्या काही दिवसात शेतीची कामे सुरू होणार असून, अशाच प्रकारे पाणी साचून राहिल्यास शेतकर्यांना शेती करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर सरपंच सौ. दक्षता मेस्त्री यांनी संबंधित यंत्रणेसह बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन वस्तूस्थितीची पाहणी केली. ठेकेदार कंपनीने मोरीचे चारही पाईप मोकळे करून पाण्याचा प्रवाह पूर्ववत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक शेतकर्यांनी दिला आहे.