सावंतवाडी : ग्राहकांचा तीव्र विरोध असतानाही सावंतवाडी शहरासह जिल्ह्यात वीज कंपनीकडून बळजबरीने स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. या विरोधात ठाकरे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत वीज अधिकार्यांना निषेधार्थ सोमवार 28 जुलै रोजी सावंतवाडी येथील वीज कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख निशांत तोरसकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वपक्षीय आणि वीज संघटनांना सोबत घेऊन वीज कंपनीच्या भोंगळ कारभारावर जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले.
निशांत तोरसकर यांनी आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, वीज कंपनी ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवत आहे, ज्यामुळे तब्बल दुप्पट ते चौपट बिले येत आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहक संतप्त झाले आहेत. शासनाने लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय हे मीटर न लावण्याचे आदेश दिले असतानाही, वीज अधिकारी त्याचे पालन करत नाहीत, असा आरोप तोरसकर यांनी केला. जिल्हा संघटक शब्बीर मणियार, माजी शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, समीरा खलील आदी उपस्थित होते.
शासनाकडून अनुदान तत्वावर मोफत मीटर बसवून दिले जातील असे खोटे सांगून हे मीटर बसवले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात त्या मीटरच्या खर्चापोटी 12 हजार रुपये ग्राहकाच्या खिशातून अतिरिक्त अधिभाराच्या नावाखाली वसूल केले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या आवाहनाला बळी पडू नये, असे आवाहन तोरसकर यांनी केले. लोकांचा विरोध असतानाही मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित ग्राहकाने आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्यांना विरोध करू, असेही ते म्हणाले.