सावंतवाडी : ‘सिंधुरत्न’ योजनेला मुदतवाढ मिळायची आहे. सोशल ऑडिटची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर ही मुदतवाढ मिळणार आहे. या योजनेला स्थगिती मिळालेली यासाठी मदत करतील याची मला खात्री आहे. त्यामुळे माजी आ.वैभव नाईक यांनी त्याची काळजी करू नये, असा खोचक टोला आ. दीपक केसरकर यांनी लगावत त्यांच्या टीकेचा समाचार घेतला.
सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रांताधिकारी हेमंत निकम, माजी नगराध्यक्ष संजू परब, महावितरण अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब आदी उपस्थित होते. सावंतवाडी येथील नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. आ. केसरकर म्हणाले, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस सावंतवाडीत की मडुरा येथे असा वाद होता. टर्मिनस सावंतवाडीतच असल्याने गाडी तिथून सुटते व थांबते. रेल्वे टर्मिनसच्या उर्वरित कामासाठी आणखी निधीची गरज आहे. कोकण रेल्वेची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते रखडले. त्यामुळे सिंधुरत्नमधून त्यासाठी निधी देण्याची सोय केली आहे. पाण्याची समस्या होती ती अडचण देखील आम्ही दूर केली आहे, असे श्री. केसरकर म्हणाले.
आंबोलीत दुर्घटना घडू नयेत यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन टीम तैनात आहेत. यासाठी आवश्यक कीट त्यांना पुरविण्यात आल्याची माहिती श्री.केसरकर यांनी दिली.
शक्तिपीठ महामार्गाची अलायमेंट बदलण्याची मागणी मी केली आहे. लवकरच यासाठी टीम येणार आहे. रेडी बंदराला हा रस्ता जोडला गेल्यास यांचा फायदा होईल. हा मार्ग शक्तिपीठ जोडणारा आहे. या महामार्गाचा कोकणाला फायदा होण्यासाठी माझा प्रयत्न आहे. बांदा ही बाजारपेठ गजबजलेली आहे. तिथे होणारे नुकसानदेखील यामुळे टळू शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, सातार्डा पुल दूरूस्ती सूचना आपण अधिकारी वर्गांला देणार आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे हा कौटुंबिक प्रश्न आहे. मात्र, मराठी ही सक्तीचीच आहे. 12 वी नंतरही पुढचे शिक्षण मराठीत व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण सुद्धा मराठीतून घेता येणार आहे. मराठीसाठी आमच्या काळात जे केले ते कोणीही केलेले नाही. राज ठाकरे यांना काही माहिती चुकीची दिली आहे. त्यांची भेट घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. त्यानंतर ते मोर्चा मागे घेतील, अशी अपेक्षा आहे. तर मुलांच्या पुस्तकांचा बोजा सरकारने कमी करावा ही माझी मागणी कायम असल्याचे श्री. केसरकर म्हणाले.
हिंदी सक्ती महाराष्ट्रात नाही. पाचवीनंतर हिंदी विषय फार आधीपासून आहे. नवीन शैक्षणिक धोरणात पहिली ते चौथीसाठी पर्यायी भाषा आहेत. सुकाणू समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. दोनच भाषा मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा सक्तीच्या आहेत. कुठली भाषा घ्यावी, हे विद्यार्थ्यांवर असेल. 9 आंतरराष्ट्रीय भाषा विद्यार्थी शिकू शकतात. मात्र, मराठी भाषा ही शिकावीच लागेल.