सिंधुदुर्गनगरी : नागरिकांना सातबारा वाटप करताना पालकमंत्री नितेश राणे. सोबत प्रमोद कामत, प्रभाकर सावंत व अन्‍य. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| ३० वर्षांनंतर सिंधुदुर्गवासीयांच्या नावे मालकी जागेचा सातबारा!

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची घोषणा लवकरच : पालकमंत्री नितेश राणे

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : तब्बल तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्गनगरीतील नागरिकांच्या हक्काच्या जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर देण्याचा ऐतिहासिक क्षण सोमवारी साकार झाला. या निमित्ताने झालेल्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री नीतेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरीचा सर्वांगीण विकास हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगत, पुढील पाच वर्षांत जिल्हा मुख्यालयाचा कायापालट करून ते आदर्श शहर म्हणून विकसित करू, अशी ग्वाही दिली. सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची घोषणा लवकरच होईल, असेही त्यांनी जाहीर केले.

नवनगर प्राधिकरण रहिवासी संघ, सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने आयोजित सातबारा लोकार्पण सोहळा शरद कृषी भवन येथे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते पार पडला. जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष दादा साईल, तहसीलदार चैताली सावंत, जि. प. सदस्या सुप्रिया वालावलकर, पांडुरंग मालवणकर, परशुराम परब, प्राधिकरण संघाचे अध्यक्ष आदेश नाईक व नागरिक उपस्थित होते.

सिंधुदुर्गनगरीला महसुली गावाचा दर्जा मिळाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या सातबारांचे वितरण यावेळी लाभार्थ्यांना करण्यात आले. सुमारे ३० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. मंत्री राणे म्हणाले, सिंधुदुर्गनगरीवासीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आपल्या मालकी जागेचा सातबारा स्वतःच्या नावावर असावा, ही प्रत्येकाची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली असून, याचे संपूर्ण श्रेय खा.नारायण राणे यांना जाते."

ते पुढे म्हणाले, "जिल्हा मुख्यालय असल्यामुळे सिंधुदुर्गनगरीचा विकास हा संपूर्ण जिल्ह्याच्या प्रतिमेशी जोडलेला आहे. त्यामुळे 'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन' या विचाराने शहराचा सर्वांगीण कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. अधिकारी नियमांचे कारण पुढे न करता विकासासाठी मार्ग काढतील. पुढील पाच वर्षांत सिंधुदुर्गनगरीचे रूप पालटून दाखवू. नगरपंचायतीची घोषणा लवकरच होईल आणि त्यानंतर आणखी एका ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार ठरू."

प्रास्ताविकात नवनगर प्राधिकरण रहिवासी संघाचे अध्यक्ष आदेश नाईक यांनी तीन दशकांच्या संघर्षाचा आढावा घेतला. महसुली गावाचा दर्जा मिळाल्यानंतर सातबारा वितरणाचा टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत, पालकमंत्री नितेश राणे आणि खा. नारायण राणे यांच्या सकारात्मक पाठपुराव्यामुळे प्राधिकरणातील अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित समस्याही लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सुप्रिया वालावलकर यांनी हा दिवस सिंधुदुर्गनगरीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी १९९९ पासून भूखंड वाटप सुरू झाले असले तरी सातबारा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगतानाच शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक आदेश नाईक यांनी, स्वागत उल्हास पालव यांनी व सूत्रसंचालन राकेश नेमळेकर यांनी केले.आभार संदीप गावडे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT