Sindhudurg ZP School 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : जि.प.कसबा- वाघोटन शाळेला रेल्वेचे रूप!

विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा वाढावा यासाठी अभिनव उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

देवगड : ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी’ या गाण्यापासूनच लहानग्यांना रेल्वेचे आकर्षण वाटत असते. ग्रामीण मुलांना शाळेत येण्याची ओढ निर्माण व्हावी यासाठी चक्क शिक्षक व ग्रामस्थांनी एक अभिनव संकल्प सत्यात उतरविली आणि शाळेच्या समोरील बाजूलाच चक्क रेल्वेचा लूक देवून विद्यार्थ्यांना शाळेबद्दलचे आकर्षण वाढविले . जि.प. शाळा कसबा- वाघोटन या शाळेला दिलेले हे अनोखे रूप औत्सुक्याचे ठरत असून भिंतीवर चितारलेली ‘शिक्षण एक्सप्रेस’ मुलांच्या कल्पनाशक्तीना चालना देणारी ठरली आहे.

ग्रामीण मुलांना शाळेत येण्याची ओढ निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून देवगड तालुक्यातील शाळा कसबा वाघोटनचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेच्या भिंतीना रेल्वेचा लूक देण्याची संकल्पना सत्यात उतरवली. ‘हसत-खेळत शिक्षण आनंददायी शिक्षण’ या संकल्पनेनुसार शाळेचे वातावरण भीतीदायक न राहता खेळकर असावे. मुले जेव्हा अशा कल्पक इमारतीत बसतात तेव्हा त्यांना आपण एक रोमांचक प्रवासावर आहोत असे या शाळेला दिलेल्या रेल्वेच्या लूकमुळे वाटत असून त्यामुळे त्यांची शिक्षणातीलही गोडी वाढते आहे.

देवगड तालुक्यातील मुलांसाठी समुद्रीप्रवास बोटी, होड्या यांचे काही विशेष आकर्षण नाही. मात्र जरी कोकण रेल्वे असली तरी देवगडसारख्या ग्रामीण भागातील लोकांना कणकवली, वैभववाडी ही रेल्वेस्टेशने दोन तासाच्या अंतरावर असल्याने एस्‌‍टी, खाजगी बसेस यांनीच प्रवास करावा लागतो. त्यामुळे शाळेच्या भिंतींनाच रेल्वेचे रूप देवून प्रत्यक्षात रेल्वेत बसल्याचा भास या संकल्पनेतून अनुभवयास मिळाला आहे.

सध्या ग्रामीण शाळांची पटसंख्या कमी होत असल्यामुळे शाळा बंद पडण्याचा मार्गावर आहेत. अशा स्थितीत जि.प.शाळांकडे मुलांचा कल वाढविण्यासाठी अशा नवनवीन कल्पना राबविणे गरजेचे आहे. त्या दृष्टिने कसबा वाघोटन शाळेच्या शिक्षक व ग्रामस्थांनी ही अभिनव संकल्पना राबवून ग्रामीण मुलांचा शाळांकडे ओढा वाढाविण्यासाठी केलेला हा स्तुत्य उपक्रम सर्वांनाच औत्सुक्याचा ठरला आहे. भिंतीवर चितारलेली ही शिक्षण एक्सप्रेस मुलांच्या कल्पनाशक्तिला चालना देते. खिडक्यांवर रेल्वेसारखे ग्रिल्स आणि डब्यांचे रंग त्यामुळे प्रत्यक्ष प्रवासाचा भास होतो. शाळा केवळ ज्ञानाचे मंदीर नाही तर मुलांच्या प्रगतीची ‘प्रगती एक्सप्रेस’ आहे. ग्रामस्थ व शिक्षकांनी ग्रामीण मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी केलेला हा उपक्रम स्तुत्य व सर्वांसाठी आदर्शवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT