sindhudurg zp News 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि ठेकेदारांचीही चौकशी

अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करण्याची पहिलीच घटना; आता ‌‘एक खिडकी‌’

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : एक दोन नव्हे तर तब्बल 13 बिलांवर चक्क बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची बनावट सही करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला असून, त्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तूर्त सही करणाऱ्या एका व्यक्तीला जबाबदार धरण्यात आले असले तरी प्रत्यक्षात बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्या बिलांवर अशा बनावट सह्या करण्यात आल्या आहेत, असे ठेकेदारही चौकशीच्या रडारवर आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी तसे संकेत दिले आहेत.

जिल्हा परिषदेचे विद्यमान पदाधिकारी विराजमान होण्यापूर्वीच हा प्रकार उघडकीस आला होता. माध्यमांनी हा प्रकार प्रसिद्ध केल्यानंतर मंगळवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांना सर्व घटनाक्रम सांगितला. जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांच्या लक्षात आले की, आपल्या बनावट सह्या कोणीतरी बिलांवर केल्या आहेत. 16 फेब्रुवारी 2026 रोजी हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांना याची माहिती दिली. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

त्यानूसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना 26 फेब्रुवारी रोजी नोटीस बजावली. त्याच दिवशी खेबुडकर यांनी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीने चौकशी करून 27 मार्च रोजी अहवाल सादर केला. या चौकशीमध्ये एका व्यक्तीला जबाबदार धरल्यानंतर त्याला आणखी कोणी सहकार्य केले का? यासाठी पुन्हा एकदा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 13 एप्रिल रोजी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. 18 मे 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित त्या व्यक्ती विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी परवानगी दिली अशी माहिती अध्यक्षांनी दिली.

पत्रकारांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर म्हणाले, आपण फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी यापूर्वीच दिली आहे. हा प्रकार गंभीर आहे. इतरांचीही चौकशी करण्यात येईल. याबाबत जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्यात येईल. तत्पूर्वी बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्याशीही पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही कुणालाही या संबंधी पाठिशी घालणार नाही. जिल्हा परिषदेमध्ये असा पहिल्यांदाच प्रकार घडला आहे हे खरे आहे. ठेकेदारांची बिले मंजूर करण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीकडून या बनावट सह्या झाल्या आहेत. त्यांनी ते मान्यही केले आहे. आता ठेकेदारांचा यात किती सहभाग आहे हे तपासून पाहिले जाणार आहे. दरम्यान उपाध्यक्ष दादा साईल यांनी याबाबत अध्यक्ष विस्तृतपणे बोलतील असे सांगितले.

दिवसभराच्या या घडामोडीनंतर अध्यक्ष आणि सभापतींनी पत्रकारांशी अध्यक्षांच्या दालनात संवाद साधला. अध्यक्षांनी आपण कुणालाही पाठिशी घालणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत हे रजेवर गेले आहेत. ते 29 तारखेला येणार आहेत. यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सर्व ते कागदपत्र आणि सहकार्य पोलिसांना करण्यात येईल असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले.

हा जो प्रकार घडला आहे, तो बांधकाम विभागातील किंवा वित्त विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय झाला नसावा, त्याकडे लक्ष वेधले असता अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले, की आम्ही सर्व बाजूने चौकशी करणार आहोत. संबंधित जे अधिकारी, कर्मचारी असतील त्यांचीही चौकशी करणार आहोत, त्याशिवाय या सर्वांमध्ये ठेकेदारांचा सहभाग आहे का? याचीही चौकशी होईल. जर ठेकेदार यामध्ये दोषी आढळल्यास त्यांनाही काळ्या यादीत टाकण्यात येईल.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, आता आम्ही ठेकेदारांची बिले वेळेत मंजूर व्हावीत कोणताही बाहेरील हस्तक्षेप होवू नये यासाठी ‌‘एक खिडकी‌’ योजना राबवणार आहोत. यापुढे दर सोमवारी आणि गुरुवारी या दोनच दिवशी बिले स्विकारण्यात येतील. त्याशिवाय बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी वगळता इतर व्यक्ती कोणी दिसल्यास त्याची तपासणी करण्यात येईल असे पुंड यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर आता जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेश करताच मी माझ्या दालनात येण्यापूर्वी बांधकाम कार्यालयात फेरी मारते असेही स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT