ओरोस ः जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना कार्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. या नुसार 14 जुलैपासून प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 21 जुलैपासून यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. या हरकतीवर 11 ऑगस्ट रोजी सुनावणी होऊन निर्णय देण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना मान्यता 18 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या मिळून 100 जागांसाठी नव्याने आरक्षण जाहीर होणार आहे. याकडे इच्छुक उमेदवारांची लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुका 2017 च्या गण रचने नुसार होणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेचे आदेश 12 जून रोजी जारी केले आहेत. सन 2017 मध्ये जाहीर झालेल्या गण व गट रचनेनुसारच या निवडणुका होणार आहेत. या रचनेनुसार जि. प. चे 50 गट आणि आठ तालुक्यातील पंचायत समितींचे मिळून 100 गण यासाठी या निवडणुका होणार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. अंतिम प्रभाग रचना 18 ऑगस्ट रोजी मंजूर होणार आहे. त्यानंतर मतदारसंघानिहाय आरक्षण नव्याने निश्चित होणार आहे. 2017 च्या निर्वाचक गण रचनानुसार या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेण्यात येणार असून निर्वाचक गण रचनेची सुरुवात जिल्ह्याच्या उत्तर दिशेकडून केली जाणार आहे. त्यानंतर उत्तर दिशेकडून ईशान्येकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करताना शेवट दक्षिणेला करावा अशा सूचना आहेत. प्रत्येक निवडणूक विभाग निर्वाचक गणाची रचना करताना भौगोलिक सचलता राहील याची काळजी घ्यावी अशाही सूचना दिल्या असून गण आणि गट रचना करताना ग्रामपंचायतीचे विभाजन होऊ नये, प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणती शंका राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
निर्वाचक गणाची रचना आटोपशीर असावी व शक्यतेवर भौगोलिकदृष्ट्या सलग असावी, अनुसूचित जाती जमाती वस्त्यांचे शक्यतो विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूक विभाग निर्वाचक गण रचना करताना नागरिकांचे दळणवळण विचारात घ्यावे. प्रत्येक निवडणूक विभाग निर्वाचक गणाच्या सीमारेषेचे वर्णन करताना उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण अशा दिशा नमूद कराव्यात. सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या गावाचे नाव त्या निवडणूक विभाग निर्वाचक मतदारसंघास देण्यात यावे, जिल्हा परिषद व पंचाय समिती मधील सरासरी लोकसंख्या दहा टक्के कमाल किमान मर्यादेचे पालन करावे, भौगोलिक परिस्थितीमुळे अगर प्रगनक गट न पडल्यामुळे प्रभागाची लोकसंख्या अनुद्य मर्यादेपेक्षा कमी अगर जास्त होत असेल तर त्याची नोेंद प्रभाग रचना प्रस्तावामध्ये करावी, जिल्ह्याच्या एकत्रिक आणि प्रत्येक तालुक्याचे वेगळे स्वतंत्र नकाशे तयार करावेत,अशा विविध राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.