जिल्ह्यात उद्यापासून जि. प., पं.स. निवडणुकीचा रणसंग्राम! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg ZP Election : जिल्ह्यात उद्यापासून जि. प., पं.स. निवडणुकीचा रणसंग्राम!

16 जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुुरुवात; राजकीय घडामोडींना वेग

पुढारी वृत्तसेवा

प्रमोद म्हाडगूत

कुडाळ : तब्बल तीन वर्षे दहा महिने आणि 19 दिवसांच्या प्रशासकीय राजवटीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पुन्हा राजकीय पदाधिकार्‍यांच्या वर्दळीने गजबजणार आहे. सोमवारी जिल्हा परिषद, पंचाय समिती निवडणुकीची घोषणा होताच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला. ही निवडणूक बदलत्या राजकीय समीकरणांची कसोटी ठरणार आहे. घोषित निवडणुक कार्यक्रमानुसार शुक्रवार, 16 जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सौ. संजना सावंत अध्यक्षपदावर विराजमान झाल्या. या सभागृहाची मुदत दि. 21 मार्च 2022 रोजी संपली; मात्र ओबीसी आरक्षणावर न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या गेल्या. परिणामी, जि. प. व पं. स.चा करभार प्रशासकाच्या नियंत्रणाखाली गेला. गेल्या चार वर्षांच्या या प्रशासकीय कालावधीत विकासकामे ठप्प झाली. निर्णय प्रक्रिया मंदावली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 50 जिल्हा परिषद सदस्य तर जिल्ह्यातील आठ पं. स. मध्ये मिळून 100 सदस्य आहेत. ग्रामीण विकासाचा कणा मानल्या जाणार्‍या या संस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गावोगावी बैठका, कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी, संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि स्थानिक नेतृत्वाला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

चव्हाण आणि खा. राणे यांची भूमिका महत्वपूर्ण

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे गेली अडीच दशकं सिंधुदुर्ग जिल्हा परिषदवर आपले नेतृत्व टिकवून आहेत. नगरपरिषद निवडणुकीसाठीही त्यांन महायुतीचा आग्रह धरला होता, मात्र त्यावेळी युती झाली नाही. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक युतीच्या माध्यमातून लढण्यासाठी खा.नारायण राणे आग्रही असतील. पण अंतिम निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर अवलंबून राहणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या निवडणुकीत प्रत्यक्ष उतरण्याची किंवा पडद्यामागून रणनीती आखण्याची शक्यता असून त्यांची भूमिका महायुतीसाठी निर्णायक ठरणार आहे.

राणेंपासून केसरकरनाईकांपर्यंत हालचाली

भाजपानेते व जिल्हयाचे पालकमंत्री नीतेश राणे यांची भूमिकाही युतीबाबत महत्वाची ठरणार आहे. शिंदे शिवसेनेचे आ. नीलेश राणे आणि सावंतवाडीचे आ. दीपक केसरकर हे सुद्धा जि. प. वर आपल्या पक्षाचे वर्चस्व राखण्यासाठी रणनीती ठरवणार हे निश्चित आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने माजी खा. विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक परंपरागत मतदार, स्थानिक प्रश्न आणि संघटनात्मक ताकदीच्या बळावर रणनीती आखतील.

अनपेक्षित निकाल आणि स्थानिक मुद्दे

अलीकडे झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांतील अनपेक्षित निकालांनी जिल्ह्यातील राजकीय गणिते ढवळून निघाली आहेत. पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारखे मूलभूत प्रश्न, पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि स्थानिक नेतृत्वाची ताकद हे सर्व घटक निकालावर निर्णायक ठरतील.एकूणच, प्रशासकीय राजवट संपल्यानंतर होणारी ही निवडणूक फक्त स्थानिक सत्तेसाठी नाही, तर कोकणच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.

मुंबई-ठाणेच्या निकालाकडे लक्ष

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गुरुवारी पार पडणार असून शुक्रवारी निकाल जाहीर होतील. निकालानंतर मुंबई महानगरपालिकेत सत्ता कोणाची? हे स्पष्ट होणार आहे. या निकालाचा काहीसा परिणाम सिंधुदुर्गातील जि. प. निवडणुकीवर उमटणार आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सिंधुदुर्ग आणि मुंबई यांच्यातील अतूट नाळ. रोजगार, व्यवसाय, शिक्षण तसेच राजकीयदृष्ट्या सिंधुदुर्गचा मोठा मतदार वर्ग मुंबईत स्थायिक आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय सत्ताबदलाचा थेट परिणाम सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणांवर होतो. मुंबई महानगरपालिकेतील सत्ता कोणाच्या हाती जाते, यावरून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील आगामी राजकीय घडामोडी, आघाड्या आणि रणनीती ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निकालांकडे लागले आहे.

सिंधुदुर्गात सत्तेचा रणसंग्राम 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला कौल

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 जागा आणि जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांमधील एकूण 100 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदार सत्तेचा कौल देणार असून, 7 फेब्रुवारीला जनतेचा निकाल स्पष्ट होणार आहे. या निवडणुकांकडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.निवडणूक रणधुमाळीचा प्रारंभ शुक्रवार दि.16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याने होणार आहे. 22 जानेवारीला अर्जांची छाननी करण्यात येणार असून, 27 जानेवारीपर्यंत इच्छुकांना माघार घेता येणार आहे. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून, अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होताच प्रचाराची खरी लढत रंगणार आहे.

महायुती विरुद्ध महाविकास असा थेट सामना

सिंधुदुर्गच्या राजकीय स्थितीचा विचार करता ही निवडणूक महायुती व महाविकास आघाडीमध्ये लढली जाईल असे सध्याचे चित्र आहे. महायुतीत भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, तर महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे; मात्र या निवडणुकीसाठी युती, आघाडी होणार की नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे सर्व पक्ष स्वतंत्र लढणार, यावर या निवडणुकीचे चित्र ठरणार आहे. जि. प. अध्यक्षपद यावेळी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने राजकीय चुरस अधिक वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT