सिंधुदुर्ग : अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली होती. उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत बंडाचा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या 50 आणि पंचायत समितीच्या शंभर अशा मिळून 150 जागांवर जवळपास 700पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजप आणि शिवसेना यांची महायुती झाली असली तरी आंबोलीसह इतर काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने महायुतीला गालबोट लागले आहे.
काही ठिकाणी महाविकास आघाडी झाली असली तरी देखील अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करण्यात आली आहे. अर्थात अर्ज मागे घेईपर्यंत बंडखोरी रोखण्यात यश मिळेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तब्बल नऊ वर्षांच्या कालखंडानंतर जिल्हा परिषद निवडणुका लागल्याने अनेक नव्या पिढीतले कार्यकर्ते रिंगणात उतरले आहेत. त्याबरोबरच यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेल्या अनेकांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. ज्या ठिकाणी ज्या प्रभागांमध्ये खुले आरक्षण आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली दिसत आहे. असे अनेक उमेदवार आहेत की त्यांनी अर्ज दाखल केले असून हे डमी अर्ज दाखल केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे अर्ज मागे घेतले जाऊ शकतात, अशी स्थिती आहे.
मंगळवारी पर्यंत 150 जागांसाठी केवळ 24 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र 1216 इतक्या अर्जांची खरेदी उमेदवारांनी केली होती. त्यामुळे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार परिसरात प्रचंड गर्दी उसळणार हे निश्चित होते. त्यामुळे सकाळपासूनच तहसीलदार कचऱ्याच्या आवारात कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. निवडणूक यंत्रणेतील अधिकारी सकाळपासूनच जय्यत तयारी मध्ये होते. सकाळी 11 वाजल्यापासूनच पटापट अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. विशेषत: भाजपने उमेदवारांची यादी जाहीर न करता उमेदवारांना थेट एबी फॉर्म घेण्याची रणनीती आखली होती. ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना सकाळी एबी फार्म देण्यात आले होते. मात्र ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी अधिकृतरित्या महाविकास आघाडी स्थापन केल्याचे कुठेही दिसले नाही. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी 2 वा. च्या सुमारास झुंबड उडाली होती. शेवटी दुपारी 3 वा.च्या सुमारास सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे गेट बंद करण्यात आले. तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवार आणि त्यासोबत दोन असे तिघांनाच पाठवण्यात येत होते. कार्यालयात आलेल्या उमेदवारांचे अर्ज 3 वाजल्यानंतरही भरण्याची प्रक्रिया सुरू होती.