वैभववाडी : दहावीच्या भुईबावडा परीक्षा केंद्रावर उघडकीस आलेल्या व सध्या जिल्ह्यात गाजत असलेल्या कॉपी प्रकरणाची माध्यमिक शिक्षण विभाग व एसएससी कोकण बोर्डकडून कसून, सखोल चौकशी सुरू आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या चौकशी दरम्यान केंद्राशी संबंधित केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांची स्वतंत्रपणे सखोल चौकशी करण्यात आली.या प्रकरणाची चौकशी माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून त्यांच्या चौकशी अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या अहवालातून त्या विद्यार्थ्याच्या मुख्य उत्तर पत्रिकेला जोडण्यात आलेल्या पुरवणी उत्तरपत्रिका कोणी लिहिल्या? कुठे लिहिल्या? त्या मुख्य उत्तरपत्रिकेला कधी आणि कशा जोडल्या गेल्या? हे सर्व होत असतांना वर्गावर असलेले पर्यवेक्षक काय करत होते? त्यांच्या हे का निदर्शनास आले नाही. असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एक नव्हे तब्बल सात पेपरमध्ये हा गैरप्रकार होत असताना केंद्रावर कार्यरत असलेल्या बोर्डाच्या यंत्रणेला याची साधी शंकाही का आली नाही. असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे दहावी या विद्यार्थ्याला कॉपी पुरवण्यासाठी एक रॅकेट कार्यरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या कॉपी प्रकरणांमध्ये नेमके दोषी कोण, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत स्पष्ट चित्र समोर येणे आवश्यक आहे.
गेल्या काही वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकण विभागात दहावीच्या निकालात सातत्याने अव्वल ठरत आला आहे. विशेष म्हणजे वैभववाडी तालुक्याने गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक विद्यार्थी मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवत असताना या कॉपी प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रतिमेलाच मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.
शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी वर्षभर प्रामाणिक मेहनत घेत असतात. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून यश मिळवतात. मात्र काही मोजक्या व्यक्तींनी केलेल्या गैरप्रकारामुळे संपूर्ण शिक्षण विभाग, शिक्षक वर्ग आणि जिल्ह्याची प्रतिष्ठा मलीन झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर जिल्ह्यातील विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकप्रतिनिधी, प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक, संस्थाचालक, पालक आणि विद्यार्थी यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर आणि उदाहरणात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘शिक्षण क्षेत्राची पवित्रता जपण्यासाठी दोषींना कोणतीही राजकीय अथवा प्रशासकीय पाठराखण न करता कठोर शिक्षा झाली पाहिजे,’ अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
दरम्यान, चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर निलंबन, विभागीय कारवाई किंवा फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणावर कारवाई होते आणि शिक्षण विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.