सिंधुदुर्ग जि.प.मध्ये २९५ शिक्षकांची भरती 
सिंधुदुर्ग

Teacher Recruitment : सिंधुदुर्ग जि.प.मध्ये २९५ शिक्षकांची भरती

पवित्र पोर्टलवर उद्यापर्यंत प्राधान्यक्रम नोंदवण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : सिंधुदुर्ग जि. प. प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या एकूण २९५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलद्वारे ही पदभरती केली जाणार असून, पात्र उमेदवारांनी १३ ऑगस्टपर्यंत आपले प्राधान्यक्रम नोंदवून अर्ज लॉक करावेत, असे आवाहन जि. प. प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील शाळांमधील शिक्षक भरतीसाठी आयोजित शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ (TAIT) मधील प्राप्त गुणांच्या आधारे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षक पदभरतीमध्ये मराठी माध्यमाची २८२ पदे आणि उर्दू माध्यमाची १३ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी मानधन तत्त्वावर दरमहा १६,००० रुपये वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रिया मुलाखतीशिवाय थेट गुणवत्ता यादीनुसार केली जाणार आहे.

शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना 'जिल्हा बदली'चा हक्क असणार नाही. तसेच TAIT-२०२५ परीक्षेपूर्वी TET किंवा CTET उत्तीर्ण असलेले व पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणित नोंदणी केलेले उमेदवारच अर्ज करू शकतात. जाहिरातीतील एकूण पदांमध्ये शासन नियमानुसार दिव्यांग व अनाथ आरक्षणाचा समावेश आहे.

उमेदवारांनी tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर जाऊन आपले पसंतीक्रम नोंदवायचे आहेत. पसंतीक्रम नोंदवून लॉक करण्याची मुदत १३ ऑगस्ट आहे. पदभरतीबाबत काही अडचण असल्यास edupavitra25@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. ​प्राधान्यक्रम नोंदवण्यापूर्वी उमेदवारांनी पोर्टलवरील सूचना व जाहिरात काळजीपूर्वक तपासून घ्यावी, असे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण व आरोग्य समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे देण्यात आले आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT