जि. प. सभापती निवडणूक बिनविरोध 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : जि. प. सभापती निवडणूक बिनविरोध

साठविलकर, राऊळ यांना पुन्हा संधी; भाजप-शिवसेनेत सत्तेचे समसमान वाटप

पुढारी वृत्तसेवा

ओरोस :सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडणुका बुधवारी बिनविरोध पार पडल्या. यात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने सत्तेचा समसमान वाटा उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. अनुभवी संतोष साठविलकर आणि प्रितेश राऊळ यांना पुन्हा एकदा सभापतिपदाची लॉटरी लागली आहे, तर सत्तेच्या या वाटपात वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना मात्र सध्या कोणतीही संधी मिळालेली नाही.

मालवण तालुक्यातील संतोष साठविलकर (शिवसेना) यांची वित्त व बांधकाम सभापती म्हणून, तर वेंगुर्ल्याचे प्रितेश राऊळ (भाजप) यांची शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून पुन्हा एकदा निवड झाली आहे. समाजकल्याण सभापतिपदी कणकवलीच्या रुहिता तांबे (शिवसेना) आणि महिला व बालकल्याण सभापतिपदी देवगडच्या नवख्या अनुराधा नारकर (भाजप) यांची वर्णी लागली आहे. दहा दिवसांपूर्वी जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर बुधवारी विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. चारही उमेदवारांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने उपजिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी शारदा पवार यांनी दुपारी सर्वांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींवर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

सत्तेचा समसमान वाटा

50 पैकी 41 सदस्यांचे भक्कम बहुमत असलेल्या महायुतीत सत्तेचे समान वाटप झाले आहे. एकूण 6 प्रमुख पदांपैकी (अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 4 सभापती) जि. प. अध्यक्ष व दोन सभापती अशी तीन पदे भाजपकडे, तर जि. प. उपाध्यक्ष व दोन सभापती अशी तीन पदे शिवसेनेला मिळाली आहेत. भविष्यात ही पदे आलटून-पालटून देण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT