सावंतवाडी : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आयोजित जनसुनावणीत दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावातील शेतकरी, बागायतदार आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला. कोणत्याही परिस्थितीत झोळंबे आणि परिसरातून हा महामार्ग जाऊ देणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला. प्रांताधिकारी वीरसिंह वसावे यांच्या उपस्थितीमध्ये ही जनसुनावणी पार पडली. स्थानिक ग्रामस्थांसह असनिये येथील पर्यावरण प्रेमी संदीप सावंत आणि पर्यावरण अभ्यासक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनीही ठाम विरोधाची भूमिका मांडत प्रकल्पातील धोके अधोरेखित केले.
जनसुनावणीदरम्यान ग्रामस्थ आणि पर्यावरण अभ्यासकांनी विविध गंभीर मुद्दे मांडले. दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील २५ गावांचा पट्टा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडून 'इको-सेन्सिटिव्ह झोन' म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या भागात शेकडो वर्षे जुनी झाडे, देवराया, वाघ, बिबट्या, ब्लॅक पँथर, किंग कोब्रा आणि स्लेंडर लॉरिस यांसारखे दुर्मीळ वन्यजीव आढळतात. १०० मीटर रुंदीच्या या महामार्गामुळे हजारो वृक्षांची कत्तल होऊन निसर्गाचा हा मौल्यवान खजिना नष्ट होईल, अशी भीती संदीप सावंत आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली.
झोळंबे गावात ४७ हून अधिक जिवंत झरे आणि अनेक बंधारे असून, या पाण्यावरच येथील सुपारी, नारळ, आंबा, काजू, कोकम आणि फणसाची समृद्ध बागायती शेती अवलंबून आहे. महामार्गासाठी डोंगर पोखरल्यास किंवा भराव टाकल्यास हे नैसर्गिक जलस्रोत आणि पाटबंधारे कायमचे बंद होतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, असा आरोप ग्रामस्थांनी केला. याशिवाय ६ ऑगस्ट २०१९ रोजी झोळंबे गावात मोठे भूस्खलन झाले होते. त्यानंतर 'जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'च्या पथकाने पाहणी करून येथील डोंगर अत्यंत संवेदनशील असल्याचे आणि येथे कोणताही मोठा मानवी हस्तक्षेप करू नये असे स्पष्ट अहवालात नमूद केले होते. या अहवालाकडे दुर्लक्ष करून महामार्ग लादला जात असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
झोळंबे गावात कुळागर आणि 'फूड फॉरेस्ट'च्या माध्यमातून शाश्वत पर्यटन विकसित झाले असून, देश-विदेशातील पर्यटक येथे निसर्ग अनुभवण्यासाठी येतात. यातून स्थानिकांना रोजगार मिळत असताना, प्रकल्पाच्या नावाखाली हा नैसर्गिक रोजगार हिरावून घेऊ नये, अशी मागणीही पुढे आली. तसेच जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गावर स्थानिकांसाठी एकही 'एक्झिट' नसल्याने या रस्त्याचा सामान्य ग्रामस्थांना कोणताही फायदा होणार नाही, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. सणासुदीच्या काळात नोटीसा बजावल्यामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे केवळ १२९ हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे बाहेरील गावी राहणाऱ्या खातेदारांच्या आणि महिलांच्या हरकती नोंदवण्यासाठी प्रशासनाने किमान ८ ते १० दिवसांची वाढीव मुदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.