कणकवली : गुरुवारी रात्री घराच्या टेरेसवरून पडून हळवल-मधलीवाडी येथील सूरज अविनाश राणे (वय २७) याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी स. ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सूरज टेरेसवरून नेमका कसा पडला, हे समजू शकलेले नाही.
सूरज हा आई-वडील व भाऊ प्रथमेश यांच्या समवेत हळवल-मधलीवाडी येथील घरात राहत असे. त्याचे आई-वडील काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यामुळे घरात सूरज व भाऊ प्रथमेश असे दोघेच होते. शेजारी राहणारे त्यांचे चुलत भाऊ सचिन सूर्यकांत राणे (४६) हे गुरुवारी रात्री सूरज यांच्या घरी झोपायला आले होते. जेवणानंतर रात्री ११ वा. च्या सुमारास सचिन आणि प्रथमेश झोपी गेले. दरम्यान सूरज कुणाला तरी फोन करण्यासाठी घराच्या टेरेसवर गेला होता. शुक्रवारी सकाळी सचिन यांना घरात सूरज दिसून आला नाही. सचिन यांनी सूरज याला फोन केला असता त्याचा मोबाईल घराबाहेर वाजत असल्याचे लक्षात आले. सचिन यांनी तेथे जाऊन पाहिले असता सूरज गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याच्या डोक्याला मागील बाजूस गंभीर दुखापत झाली होती.
परिसरातील ग्रामस्थांनी सूरज याला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता सूरज याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सूरज हा उत्कृष्ट चित्रकार होता. तो हुबेहूब रांगोळ्या रेखाटायचा. सध्या तो बोर्डवे येथे पोस्ट खात्यात कार्यरत होता. तत्पूर्वी तो हळवल ग्रामपंचायतीचा सदस्य देखील होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका काकी असा परिवार आहे. हळवल गाव तंटामुक्त समितीचे माजी सदस्य अविनाश राणे यांचा तो मुलगा होय. त्याच्यावर हळवल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.