कणकवली : मोटारसायकल अडवून शिवीगाळ का केली? अशी विचारणा केल्याच्या रागातून कलमठ-गोसावीवाडी येथील भावेश बाळकृष्ण रजपूत (वय 21) याच्या छातीवर, पाठीवर आणि दंडावर कटर ब्लेडने वार करण्यात आले. कणकवली-नाथ पै नगर येथे 3 मे शनिवारी रात्री 11 वा.च्या सुमारास झालेल्या या हल्लाप्रकरणी आकाश शिवाजी निकम (रा. नाथ पै नगर कणकवली), ओंकार किंजवडेकर, हेमंत भोगले (दोघे रा. हरकुळ बुद्रुक) यांच्याविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतर संतप्त जमावाने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत पोलिसांशी वाद घातला. तसेच पोलिसांच्या अंगावर धावून धमक्या दिल्या. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सचिन माने यांच्या फिर्यादीवरून एका महिलेसह 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हल्ल्यात जखमी भावेश याचा मित्र हिमांशु परब याचा वाढदिवस असल्याने भावेशचे मित्र साहिल आणि आर्यन हे केक आणण्यासाठी कणकवली बाजारपेठेत गेले होते.
त्यावेळी साहिल आणि आर्यन यांची मोटरसायकल अडवून आकाश निकम, ओंकार किंजवडेकर, हेमंत भोगले यांनी त्यांना शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी नाथ पै नगर येथे भावेश आणि सहकारी गेले असता वरील संशयितांनी भावेशच्या छातीवर, पाठीवर आणि दंडावर कटर ब्लेडने वार केले. जखमी भावेश याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. भावेशच्या तक्रारीवरून तीन्ही संशयितांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भावेश रजपूत याच्यावर कटर ब्लेडने वार केल्याची घटना समजताच कणकवली पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी सुमारे 60 ते 70 जणांचा जमाव उपजिल्हा रुग्णालय आवारात जमला होता. संतप्त जमावाकडून आरोपींना आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांच्या अंगावर धावून गेले व धमकी दिली.
त्यानंतर कॉन्स्टेबल सचिन माने यांच्या फिर्यादीवरून श्वेता परब, नमिता गावडे, हिमांशु संदीप परब, आर्यन सावंत, साहिल सावंत, वैभव मालंडकर, रोहित जाधव, मिनार रजपूत, सूरज राणे, विनीत रजपूत, यश पाटील, मयुर धुमाळे, नवराज झेमने, प्रणय शिर्के, लवू कलकुटकी, चेतन पाटील, प्रणय पाटील यांसह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतप्त जमावाकडून आरोपींना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली जात होती. त्यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता आरोपींनी पोलिसांच्या कामात अटकाव करत पोलिसांच्या अंगावर धावून जात बाहेर पड तुला दाखवतो, अशी पोलिसांना धमकी दिली.