आचरा : महावितरण अभियंत्यांना जाब विचारताना भाजप-शिवसेना पदाधिकारी.  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : विजेचा धक्का कामगाराला; महावितरणला ग्रामस्थांचा शॉक!

उपचारांसाठी आर्थिक मदतीची मागणी; जबाबदारी निश्चित करण्यासाठी दोन तास घेराव, फौजदारी तक्रारीचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

आचरा : कामगाराच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आणि अपघातानंतर उत्तरदायित्व स्वीकारणार कोण? वायंगणी-पाटवाडी येथे डीपी कामादरम्यान विजेचा धक्का लागून कंत्राटी कामगार राजेश पाटणकर गंभीर जखमी झाल्याने हा संतप्त सवाल ऐरणीवर आला आहे. जखमी कामगार रुग्णालयात उपचार घेत असताना अपघाताची जबाबदारी मात्र महावितरण आणि ठेकेदार एकमेकांवर ढकलत असल्याचा आरोप करत शुक्रवारी भाजप-शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आचरा महावितरण कार्यालयावर धडक दिली. ‘जबाबदारी झटकू नका, जखमी कामगाराला न्याय द्या!’, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

गुरूवारी वायंगणी-पाटवाडी येथे विद्युत खांबावर डीपीचे काम करताना विजेचा जोरदार धक्का लागून कंत्राटी कामगार राजेश गोपाळ पाटणकर (३२, रा. चिंदर, गावठणवाडी) गंभीर जखमी झाल्याच्या घटनेचे पडसाद शुक्रवारी आचरा येथे उमटले. जखमी कामगाराच्या उपचारांसाठी तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि या अपघाताची जबाबदारी निश्चित करावी, या मागण्यांसाठी भाजप-शिवसेना पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थांनी आचरा वीज कार्यालयावर धडक देत सुमारे दोन तास घेराव घातला. अपघाताच्या जबाबदारीवरून वीज अभियंता आणि ठेकेदार यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. मागण्या मान्य न झाल्यास महावितरण विरोधात फौजदारी तक्रार दाखल करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

जबाबदारी कोणाची? अधिकाऱ्यांना सवाल

आंदोलनादरम्यान अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले. भाजपचे संतोष गांवकर यांनी या घटनेची जबाबदारी महावितणने स्वीकारल्याशिवाय कार्यालयातून हलणार नसल्याची भूमिका घेतली. यावर वीज अभियंत्यांनी सदर अपघातासाठी ठेकेदार जबाबदार असल्याचे सांगितल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी जखमी कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

वीजपुरवठा बंद असल्याचे सांगितल्यानंतरच काम सुरू केल्याचा ठेकेदाराचा दावा

दरम्यान महावितरणचे ठेकेदार श्री. गोवेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले वायरमन राजेश पाटणकर हा आपला कामगार असून तो पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याच्या उपचारांची जबाबदारी आपण घेतली आहे. मात्र, अपघाताची जबाबदारी आपली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याला महावितरणकडून कामासाठी बोलावण्यात आले होते. विद्युत पुरवठा बंद केला असून काम करण्यास हरकत नसल्याचे सांगण्यात आल्यानंतरच त्याने कामाला सुरुवात केली. मात्र काम सुरू असतानाच त्याला विजेचा धक्का बसून तो खाली पडला, असा दावा ठेकेदाराने केला. विद्युत पुरवठा सुरू किंवा बंद करण्याची जबाबदारी महावितरणची असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदाराच्या या स्पष्टीकरणानंतर ग्रामस्थांनी पुन्हा वीज अभियंत्यांना जाब विचारला. अपघात नेमका कशामुळे घडला, याची सखोल चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली.

या आंदोलनात कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुका पदाधिकारी धोंडी चिंदरकर,संतोष गांवकर, पं. स. सदस्य दीपक सुर्वे, महेश वरक, देवेंद्र हडकर, एकनाथ पवार, शाहुलखन बांदिवडेकर, विनोद लब्दे, गणेश पाटणकर, विनायक मसुरकर, विराज सावंत, संतोष अपराज आणि आशिष तोंडवळकर उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जि.प. सदस्य वर्षा सांबारी, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, शिवसेना आचरा विभागप्रमुख संतोष कोदे, मनोज हडकर, भाऊ हडकर, जय प्रकाश परुळेकर, अभय भोसले आणि चंदू सावंत आदींनीही आंदोलनात सहभाग घेतला.

आंदोलनाची माहिती मिळताच आचरा सहा. पोलीस निरीक्षक संजय कतविले घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तास चाललेल्या घेरावानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. मात्र, जखमी कामगाराला न्याय मिळेपर्यंत आणि अपघाताची जबाबदारी निश्चित होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT