छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (संग्रहित छायाचित्र) File Photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावर पुन्हा पुतळा उभारणीच्या कामाला वेग

शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष उचलले

पुढारी वृत्तसेवा

मालवण ः मालवण-राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नव्याने उभारण्यात येणार्‍या पुतळ्याच्या कामाने वेग घेतला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून याठिकाणी कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष उचलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. तूर्तास कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत जतन करून ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.यावेळी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, अजित पाटील, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांसह अन्य उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. त्यानंतर हा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सर्वत्र रोष व्यक्त करण्यात आला. चार महिन्यानंतर राज्य सरकारने याठिकाणी 60 फुटी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते.

राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. इतर बोलीदारांच्या कोटेशनची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला 20.95 कोटींमध्ये हे काम देण्यात आले आहे. हे काम त्यांना सहा महिन्यात पूर्ण करावे लागणार आहे.

असा असणार पुतळा...

कास्य धातूपासून 60 फूट उंचीचा 8 मीमी जाडीचा पुतळा असल्याचे समजते. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची 60 फुट इतकी असणार आहे. तर पुतळा पेलण्यासाठी 3 मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. निविदेनुसार 100 वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर कंत्राटदार कंपनीने 10 वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचीही अट घातली आहे. आधी 3 फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल.

कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम

कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतले जाईल. आधीच्या पुतळ्याला कला संचालनालयाची मान्यता घेतली गेली नव्हती, असा आरोप करण्यात आला होता. अधिकार्‍यांनी सांगितले की, नव्या पुतळ्याचा प्रकल्प आयआयटी-मुंबई आणि अनुभवी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे. तसेच पुतळा मजबूत असा उभारला जावा, यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT