कणकवली : खारेपाटण परिसरातील एक गरोदर महिला सासू सोबत रविवारी मध्यरात्री कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने व खासगी रुग्णालयात जाण्याइतपत त्यांची परिस्थिती नसल्याने कार्यरत डॉक्टर तिला 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र वाटेतच असह्य प्रसूतीकळा येऊ लागल्याने ओसरगाव टोल नाका दरम्यान रुणवाहिकेतच तिची प्रसूती करण्यात आली. कणकवली उपजिल्हा रुग्णालय व 108 रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी जी कर्तव्यदक्षता दाखवली त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री डॉ. आकाश कानडे हे कार्यरत होते. मध्यरात्री 1.50 वा. च्या सुमारास एक गरोदर 31 वर्षीय महिला उपचारासाठी आली होती. तिच्या सोबत फक्त एक महिला होती. रुग्णालयात स्त्री रोगतज्ञाचे पद रिक् असल्याने डॉ. कानडे यांनी तिची तपासणी केली. महिलेजवळ गरोदरपणातील सोनोग्राफी स्कॅन व इतर रिपोर्ट नसल्याने नेमकी बाळाची स्थिती लक्षात येत नव्हती मात्र लवकरात लवकर प्रसूती करणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्याने जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचे ठरविण्यात आले. महिलेची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. कानडे यांनी मदतीसाठी डॉ. श्रीनिवास पोलशेटवार यांना बोलावून घेतले. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन ड्युटीवर नसतानाही डॉ. पोलशेटवार तेथे दाखल झाले. त्यानंतर 108 रुग्णवाहिका बोलावण्यात आली. 108 मध्ये डॉ. नागनाथ होनराव हे असले तरी प्रसूती केव्हाही होऊ शकते हे विचारात घेऊन उपजिल्हा रुग्णायलाचे डॉ. आकाश कानडे व डॉ. श्रीनिवास पोलशेटवार हे देखील रुग्णवाहिकेतून त्यांच्यासोबत ओरोस जिल्हा रुग्णालयात जायला निघाले.
रुग्णवाहिकेला जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यासाठी 25 मिनिटे लागतात. तेवढ्या वेळात पोहोचता येईल असा डॉक्टरांचा अंदाज होता, मात्र 10 ते 15 मिनिटांत रुग्णवाहिका महामार्गावरून ओसरगाव टोलनाका दरम्यान पोहोचली असता प्रसूतीकळा वाढल्या. जिल्हा रुग्णालय बरेच दूर असल्याने रुग्णवाहिकेतच प्रसूती करण्याचे डॉक्टरांनी ठरविले. महिलेचे कोणतेही रिपोर्ट त्यावेळी उपलब्ध नव्हते. त्यामुळे महिला व पोटातील बाळ यांची नेमकी प्रकृती परिस्थिती काय आहे, याची रुग्णवाहिकेत असलेल्या डॉक्टरांनाही कल्पना नव्हती. तरीही या तिन्ही डॉक्टरांनी धाडस दाखवत महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. अखेर उत्तर रात्री 2.16 वाजण्याच्या सुमारास महिला प्रसूत झाली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसुतीनंतर बाळ रडणे आवश्यक होते, मात्र त्याच्या गळ्याभोवती नाळ्याची दोन वेटीळी होती. डॉक्टरांनी योग्य उपचार केल्यानंतर काही वेळातच बाळ रडले. बाळ व आई सुखरूप असल्याची खात्री करत तोपर्यंत रुग्णवाहिका ओरोस जिल्हा रूग्णालयाच्या आवारात पोहोचली होती. डॉक्टरांनी बाळाला अतिदक्ष विभागात नेत आईला संबंधित विभागात दाखल केले.
दोघांची प्रकृती स्थित असल्याची खात्री केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पुन्हा आपल्या रुग्णसेवेत दाखल होण्यासाठी कणकवलीच्या दिशेने निघाले. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. कानडे हे परभणी, डॉ. पोलशेटवार हे नांदेडचे आहेत. दोघांनीही एमबीबीएस पूर्ण केले असून ते गेले सहा महिने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत आहेत. डॉक्टर द्वईनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षतेबद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले जात आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची असणारी कमतरता यानिमित्ताने आता प्रकर्षाने पुढे आली आहे. रुग्णालयातील स्त्री रोगतज्ज्ञाचे पद गेले सहा महिने रिक्त आहे. एकेकाळी उपजिल्ह्यातील प्रसूती विभाग हा नेहमी भरलेला असायचा मात्र आता स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर महिलांना ओरोस जिल्हा रुग्णालय अथवा कुडाळ महिला रुग्णालय येथे उपचारासाठी जावे लागत आहे. रुग्णालयातील इतरही अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्तअसून ती तातडीने भरण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.