वन्‍य प्राण्याच्‍या शिकार प्रकरणाला नवे वळण 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : वन्‍य प्राण्याच्‍या शिकार प्रकरणाला नवे वळण

आपला काही संबंध नसल्‍याचे जमीन मालकांचे स्‍पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

​कुडाळ : अणाव येथील जंगल परिसरात जमिनीखाली पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृत जंगली प्राण्याच्या प्रकरणाने कुडाळ तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. वनविभागाने याप्रकरणी परिसरातील तीन शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या असतानाच, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संबंधित शेतजमिनीचे मालक विनायक अणावकर यांनी समोर येत आपली बाजू स्पष्ट केली असून, ती सामायिक जमीन आमची असली, तरी या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. तसेच तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

​लागवडीसाठी गेलो अन् वनविभाग दिसला!

या प्रकरणाबाबत माहिती देताना विनायक अणावकर म्हणाले की, अणाव येथील सर्वे नं. २४/१५ मधील ज्या जागेत जंगली प्राण्याला पुरण्यात आले होते, ती जमीन आमची सामायिक जमीन आहे. गेली वीस वर्षे आम्ही ती जमीन दुसऱ्या एका व्यक्तीला शेती करण्यासाठी दिली आहे. यावर्षी शेतात काही नवीन लागवड करायची म्हणून मी स्वतः तिथे गेलो होतो. त्यावेळी त्याठिकाणी वनविभागाचे अधिकारी आधीच तपास करत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यांनी माझ्याकडे या जागेबाबत विचारणा केली असता, मी जमीन आमची असल्याचे मान्य केले; परंतु या मृत प्राण्याच्या प्रकरणाशी आमचा काडीचाही संबंध नाही, असे स्पष्ट करत वनविभागाकडे माझा जबाब नोंदवून दिला आहे. भविष्यातही तपासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.

​दोन महिन्यांपूर्वीची घटना; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

​प्राथमिक तपासात ही घटना सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. दरम्यानच्या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे घटनास्थळावरील माती आणि महत्त्वाच्या खुणा पुसल्या गेल्या आहेत. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळापासून तब्बल दोन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला, मात्र पावसामुळे ठोस भौतिक पुरावे शोधण्यात यंत्रणेला अडचणी येत आहेत. असे असले तरी, प्राण्याला मानवी वस्तीच्या जवळ जमिनीखाली गाडणे, हीच बाब शिकारीच्या संशयाला अधिक बळकटी देणारी ठरली आहे.

सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कडावल वनविभागाचे अधिकारी वैभव भिसे व त्यांचे पथक या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. जमीनमालक विनायक अणावकर यांच्या जबाबानंतर आता या प्रकरणातील संशयित आरोपी कोण? याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे.

​संशयित व बंदूकधारी वनविभागाच्या रडारवर

​वनविभागाने तपासाचा रोख आता स्थानिक शेतमालकांकडे वळवला असून तीन शेतकऱ्यांना संशयित मानून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या जबाबातून शिकारीचे 'गूढ' उकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, पोलिसांनीही स्थानिक पातळीवर बंदूक परवाना असणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून बेकायदेशीर शिकारीसाठी वापरण्यात आलेले हत्यार कोणाचे होते, याचा माग घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT