'ओंकार'चा सोनुर्लीतील रिसॉर्टमध्ये फेरफटका 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : 'ओंकार'चा सोनुर्लीतील रिसॉर्टमध्ये फेरफटका

पर्यटकांमध्ये आधी घबराट, नंतर सेल्फी घेण्यासाठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडीः सोनुर्लीतील आणि परिसरातील गावांमध्ये वावर असलेला ओंकार हत्‍ती फिरत फिरत तेथीलच एका रिसॉर्टमध्ये शुक्रवारी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास पोहोचला. रिसॉर्टच्या आवारात ओंकार हत्‍ती दाखल झाल्‍यानंतर एकच पळापळ झाली. रिसॉर्ट परिसरात सुट्‌टीचा आनंद घेणाऱ्या पर्यटक सुरूवातीला घाबरले मात्र नंतर त्‍यांनी सेल्‍फी, व्हिडिओचा आनंद घेतला. रिसॉर्टची बाग व परिसरात शांतपणे फिरून ओंकार हत्‍तीने बाहेर पडणे पसंत केले.

सावंतवाडी तालुक्‍यातील सोनुर्ली गावात गेले दोन दिवस ओंकार हत्‍तीचा वावर आहे. ओंकारने गावात वावरत असतानाच तेथीलच एका रिसॉर्टच्या आवारात प्रवेश केला. तो दाखल होताच कर्मचारी व पर्यटकांची धावपळ झाली. सुट्‌टीचा आनंद घेण्यासाठी रिसॉर्टमध्ये आलेले पर्यटक सुरुवातीला घाबरले खरे मात्र नंतर त्‍यांनी ओंकार हत्‍तीच्या दर्शनाचा आनंद घेतला. जंगली हत्‍तीचे जवळून दर्शन झाल्‍याने पर्यटकही सुखावले. रिसॉर्ट परिसरात शांतपणे फिरून ओंकार हत्‍तीने बाहेर जाणे पसंत केले.

सोनुर्लीतील रिसॉर्टमध्ये ओंकार हत्‍ती दाखल झाल्‍यानंतर रिसॉर्टचे मालक सुखावले. दोन दिवसापासून गावात वास्‍तव्यास असलेला ओंकार श्री देवी माऊली मंदिराजवळून शुक्रवारी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास थेट रिसॉर्टमध्ये पोहोचला. त्‍याला पाहताच रिसॉर्टचे मालक नंदू तारी व त्‍यांचा मुलगा करूणेश तारी यांना आनंद झाला.

गणरायाच्या कृपेने ती इच्छा पूर्ण

ओंकार हत्‍तीने आपल्‍या रिसॉर्ट परिसरात यावे ही त्‍यांची मनापासूनची इच्छा होती आणि गणरायाच्या कृपेने ती इच्छा पूर्ण झाली अशी भावना नंदू तारी यांनी व्यक्‍त केली. सुमारे दोन तास रिसॉर्ट परिसरात फिरल्‍यानंतर ओंकार न्हावेलीच्या दिशेने रवाना झाला. रिसॉर्ट परिसरात माड, पोफळी व फळझाडे अशी अनेक झाडे असूनही ओंकार हत्‍तीने कोणत्‍याही झाडाचे नुकसान केले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT