दोडामार्ग : गेले अडीच महिने वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणारा ओंकार’ हत्ती दोडामार्ग तालुक्यात परतला आहे. सोमवारी तो परमे गावात दाखल झाला. त्याची आई आणि दोन भावंडे सध्या केर गावच्या जंगलात असून ‘ओंकार’ व त्याच्या कुटुंबातील अंतर केवळ ५-६ कि.मी. आहे. यामुळे ओंकारची येत्या दोन दिवसात भेट व्हावी, यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे, अशी माहिती दोडामार्गचे वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांनी दिली.
आपल्या कुटुंबापासून अलिप्त झालेला ‘ओंकार’ हत्ती गेले अडीच महिने दोडामार्ग तालुक्याच्या बाहेर होता. वेंगुर्लेे, कुडाळ, सावंतवाडी या तिन्ही तालुक्यात ओंकारची भ्रमंती सुरू होती. या दरम्यान ‘ओंकार’ शेती, बागायतीसंह अनेक गाड्यांचे नुकसान केले. आता ‘ओंकार’चे आगमन रविवारी दोडामार्ग तालुक्यात झाले असून सोमवारी तो परमे गावात पोहोचला. तर त्याची आई आणि दोन पिल्ले केर गावात फिरत आहेत. यामुळे सोमवारी मध्यरात्री किंवा मंगळवारी सकाळी ‘ओंकार’ची कुटुंबाशी भेट होण्याची चिन्हे आहेत. जर त्याची आईशी भेट झाली तरी तो आपल्या कुटुंबात कितपत स्थिर राहतो, यावर वनविभाग लक्ष ठेवून आहे. चंदगड तालुक्यात गणेश, बाहुबली, हे दोन हत्ती वास्तव्यास आहेत. केर गावात मादी आणि दोन पिल्ले, तर ओंकार सध्या परमे गावात पोहोचला आहे.