देवगड : न.पं. मुख्याधिकारी व नगराध्यक्षांशी चर्चा करताना समितीचे पदाधिकारी, सदस्य. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : मोकाट गुरांसाठी सुसज्ज कोंडवाडा निर्मितीचे काम प्रगतिपथावर

देवगड-जामसंडे शहर विकास समितीला न. पं. मुख्याधिकाऱ्यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड-जामसंडे शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न 'जैसे थे' असल्याच्या विषयावरून आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत दुसरे स्मरणपत्र देण्यास गेलेल्या देवगड- जामसंडे शहर विकास समन्वय समितीसमोर न. पं. मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी या विषयासाठी न. पं. प्रशासनाने मागितलेल्या मुदतीत केलेल्या कामांचा लेखाजोखाच मांडला. मोकाट गुरांप्रश्नी न. पं. प्रशासन अधिकारी यांच्यासह आरोग्य व स्वच्छता सभापती बुवा तारी हे स्वतः या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना राबवित आहेत. मोकाट गुरांचा बंदोबस्त करताना त्यांचे संगोपन व त्यासाठी सुसज्ज कोंडवाडा निर्माण करण्याचे काम न. पं. प्रशासन योग्य पद्धतीने करीत असून जनतेनेही न. पं. ला सहकार्याची भूमिका ठेवावी, असे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले.

नगराध्यक्षा साक्षी प्रभू, सभापती बुवा तारी, न. पं. प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, स्वच्छता निरीक्षक श्री. कोरगावकर यांच्यासह समितीचे शामल जोशी, अण्णा खवळे, सुधीर मांजरेकर, नाना सारंग, गिरीश धोपटे, श्री. खवणेकर, राजू मेस्त्री, संजय लवेकर आदी उपस्थित होते.

मोकाट गुरांप्रश्नी शहर विकास समन्वय समितीने मंगळवारी न. पं. कार्यालयात मुख्याधिकारी गौरी पाटील यांची भेट घेतली. देवगड, जामसंडे शहरात मोकाट गुरांचा प्रश्न जैसे थे आहे. न. पं.च्या मागील सभेत एका नगरसेवकाने मोकाट गुरांप्रश्नी तात्काळ उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. नेनेनगर येथे कोंडवाड्यासाठी जागा सुचवून तेथे मोकाट गुरे बांधण्यात येतील, असे त्या नगरसेवकाने सांगितले होते. परंतु हे आश्वासन खोटे ठरले असून न. पं. प्रशासनाने अथवा नगराध्यक्षांनी अशा नगरसेवकाला खोटे आश्वासन देण्यापासून का रोखले नाही? असा सवाल समिती पदाधिकाऱ्यांनी केला.

यावर मुख्याधिकारी गौरी पाटील म्हणाल्या, संबंधित नगरसेवकाने कोणते आश्वासन दिले याच्याशी आपला संबंध नाही. प्रशासन म्हणून मोकाट गुरांप्रश्नी उपाययोजना राबविण्यासाठी आपण जी मुदत जनतेला सांगितली होती, त्या मुदतीत प्रशासनाकडून सुसज्ज कोंडवाडा तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रशासन अधिकाऱ्यांसह सभापती बुवा तारी यांचेही यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जनतेचेही सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समिती पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले. जामसंडे -खाकशी ते देवगड एसटी स्टॅण्ड या मुख्य रस्त्यावर विद्युत व्यवस्था करावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीला मुख्याधिकारी गौरी पाटील व सभापती बुवा तारी यांनी सकारात्मकता दर्शविली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT