कणकवली : शनिवारी सायंकाळी कोकणात मान्सूनची दिमाखदार इन्ट्री झाली; पण कोकणवासीयांचा सोमवारी असलेला मिरग मात्र कोरडाच गेला. खरे तर मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील काही दिवस तरी दमदार पाऊस होतो. परंतु यावर्षी सुपर अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून १५ जून पासून सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कोकणात भात पेरणीची कामे सुरू केली आहेत. मात्र, शेतकऱ्यांसह सर्वांनाच आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी सरासरीच्या तुलनेत ९० टक्केच पाऊस पडेल, असा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाने आधीच साऱ्यांची चिंता वाढवली आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत केरळममधुन वेगाने मान्सूनची वाटचाल सुरू झाली आणि अवघ्या दोन दिवसातच तो महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत पोहोचला. शनिवारी सायंकाळी सिंधुदुर्गसह कोकण त्याने व्यापून टाकला. रविवारीही काही प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे सोमवारचा मिरग तेवढाच दिमाखदार साजरा होईल, अशी आशा होती, परंतु सोमवारी दिवसभर अधून मधून कडक ऊन पडले होते. सायंकाळी पाऊस लागेल, अशी अपेक्षा होती; मात्र तीही फोल ठरली.
१५ जूनपासून मान्सून सक्रिय होणार
मृग नक्षत्राच्या प्रारंभालाच मिरग असे संबोधले जाते. या दिवशी धुवाँधार नसला तरी रिमझिम पाऊस पडतो, मात्र तोही यावर्षी पडला नाही. त्यामुळे ‘मान्सून इलो पण मिरग कोरडोच गेलो’ अशी प्रतिक्रिया कोकणी माणसाकडून ऐकाला मिळाली. हवामान खात्याने १५ जून पासून जरी मान्सून सक्रिय होण्याची तारीख दिली असली तरी पुढील दिवसात चांगल्या पावसाकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.