जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Rain : जिल्ह्यात नदीनाल्यांची पाण्याची पातळी वाढली; शेतीकामांना वेग

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : सिंधुदुर्गात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा रविवारी दुपारपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले असून, नदी-नाले प्रवाही होत पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाने जोर धरल्याने शेतीच्या कामांना वेग येणार असून, शेतकरी वर्ग सुखावला आहे. काही भागांत भातरोपांच्या लावणीची कामेही सुरू झाली असून, भातरोपांची जोमाने वाढ होण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागांत रविवारी दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू होती.

सिंधुदुर्गात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याने अपेक्षित जोर धरला नव्हता. मागच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होत असतानाच गेले दोन दिवसांपासून पाऊस गायब झाल्याचे चित्र होते. निरभ्र आकाश, कडकडीत ऊन तर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर जिल्ह्यातील काही भागांतील शेतकऱ्यांनी भात पेरणी केली होती. त्यामुळे लावणीची कामे सुरू करण्यासाठी पावसाने जोर घेणे अपेक्षित होते. पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची प्रतीक्षा असतानाच रविवारी दुपारी १ वा.च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. पावसाचा जोर कमी असला तरी सायंकाळपर्यंत जिल्ह्याच्या सर्वच भागांत संततधार सुरू होती. त्यामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला होता.

रिपरिप पडणाऱ्या पावसामध्ये जोर नसल्याने जून महिना संपत आला, तरी नदीनाल्यांमधून फक्त प्रवाह सुरू झाला होता. रविवारी दुपारनंतरच्या पावसाने नदीनाल्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले. मात्र, अद्यापही नदीनाले तुटुंब भरून वाहताना दिसत नाहीत. संततधार पावसामुळे नदीनाले प्रवाहीत होतानाच जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्येही वाढ होत आहे. या पावसामुळे शेतशिवारातील झरे प्रवाही होणार असून, शेतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. वटपौर्णिमेचा सण सोमवारी असल्याने रविवारी दुपारनंतर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, पावसाची संततधार असल्याने त्यांच्या उत्साहावर काहीसे विरजन पडले. सायंकाळी बाजारपेठांमध्ये महिला वर्गाची गर्दी दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT