कुडाळ : कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्हाभरात रविवार पासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. दुपारपासून कुडाळ शहरासह तालुक्यात धुवाॅधार पावसाचा कहर सुरूच होता. या पावसाने वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलांसह नागरीकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १८.२५ मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान ग्रामीण भागात भात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. बऱ्याच ठिकाणी भात लावणीलाही सुरुवात झाली आहे.
यंदा विलंबाने दाखल झालेला पावसाने गेल्या चार दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र रविवारपासून कुडाळसह सर्वत्र पावसाने पुन्हा जोर धरला. सकाळच्या सत्रात अधूनमधून पावसाची संततधार सुरू होती. मात्र दुपारनंतर कुडाळ शहरासह तालुक्यात पावसाने अधिक जोर धरला. उशिरापर्यंत पावसाचा कहर सुरूच होता. या पावसाने कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक परिसरात मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचले. तेथे रस्त्यालगत पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडून दक्षता घेण्यात न आल्याने रस्त्यालगतच्या भागातून येणारे पावसाचे पाणी गटारात न जाता थेट मुख्य रस्त्यावर आले. या पाण्यातून पादचारी नागरिकांसह वाहनांची ये-जा सुरू होती. पादचारी नागरिकांसह तेथे रस्त्यालगत दुकाने थाटलेल्या फिरत्या विक्रेत्यांना या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
ग्रामीण भागात भात शेतीच्या कामे जोरात सुरू असून, या पावसाने आता भात लावणीचीही कामे वेग घेणार आहेत. त्याचबरोबर आंबा, काजू कलमांच्या लागवडीचीही कामे जोरात सुरू आहेत. तसेच पावसाने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला होता.