सिंधुदुर्ग जिल्हयात पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्हयाची पाण्याची स्थिती आतापर्यंत तरी चांगली असून गतवर्षीच्या तुलनेत जिल्हयाची भूजल पातळी वाढली आहे. पाटबंधारे प्रकल्पांचा विचार करता पाटबंधारे प्रकल्पांमध्ये यंदा 55.92 टक्के पाणीसाठा आहे. अर्थात तिलारी प्रकल्पातील पाण्याचा वापर वाढल्याने ही एकूण टक्केवारी कमी झाली असली तरी सरासरी पाणीसाठा 60 टक्क्यापर्यंत आहे. एकूणच समाधानकारक पाणी पातळीमुळे दरवर्षी जाणवणार्या टंचाईग्रस्त वाड्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अद्यापपर्यंत तरी पाणी पातळी जरी स्थिर असली तरी उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने पाण्याचा वापर जपून करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.
तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील इतर प्रांतांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस होतो. यंदा सरासरीच्या 110 टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडल्याने जिल्हयाची पाण्याची पातळी दिलासादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ भुवैज्ञानिक भूजल सर्वेक्षणाच्या सर्व्हेमध्ये जिल्हयाच्या पाणी पातळी काहीशी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. ही बाब दिलासादायक असली तरी दरवर्षीच्या तुलनेत कच्चे आणि वनराई बंधारे झालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे मात्र यंदा निसर्गाने साथ दिली आहे त्यामुळे पाणी पातळी टिकून आहे. इतर जिल्हयांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्हा हा टँकरमुक्त झालेला जिल्हा आहे. मार्च, एप्रिलनंतर काही वाड्यांना टंचाई जाणवते परंतू ते ही प्रमाण आता जलजीवन मिशनसह विविध प्रकारच्या पाणी पुरवठा योजनांमुळे कमी झाले आहे. दरवर्षी जिल्हयाचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार केला जातो. त्यानूसार यंदाही टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये संभाव्य पाणी टंचाई जाणवू शकणार्या वाड्यांसाठी विहिरी, बोअरवेल, पाणी स्त्रोतांमधील गाळ काढणे, पूरक नळयोजना ही कामे सुचवण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षापासून जिल्हयात केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील 50 टक्केच्या आसपास कामे पुर्णत्वास आली आहेत त्यामुळे त्याचाही फायदा ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे.
यंदा दिवाळीपर्यंत पाऊस बरसला, जेवढा पाऊस लांबेल तेवढी पाण्याची पातळी टिकून राहते. यंदा लांबलेल्या पावसाचा फायदा भूजल पातळी स्थिर राहण्यास झाली आहे, ही जमेची बाजू आहे. आता फेब्रुवारी महिना संपत आला असून पुढील तीन महिने हे कडक उन्हाळ्याचे असणार आहेत, त्यामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया ही अधिक वेगाने होणार आहे. त्यामुळे असलेला पाणीसाठा जपून वापरणे आवश्यक आहे. अनेकदा पाणी पुरवठा योजना असतात परंतू योजनांचे स्त्रोतच आटून जातात. त्यामुळे दरदिवशी होणारा नळपाणी पुरवठा चार दिवसांवर तर काही वेळा आठवड्याने होतो. उन्हाळ्यात शेवटी शेवटी काही गावांमध्ये ही परिस्थिती उद्भवते. मात्र यंदा अद्याप तरी चित्र चांगले आहे.
फेब्रुवारी अखेरपर्यंत तरी जिल्हयाची पाणी पातळी दिलासादायक असल्याने विहिरी व अन्य पाण्याचे स्त्रोत टिकून आहेत. विंधन विहिरींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होतो. त्या तुलनेत पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यासाठी दरवर्षी तेवढ्याच उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पाणी वापरात काटकसरपणा व पाण्याचा अपव्यय टाळणे हे देखील होणे आवश्यक आहे. पुढील तीन महिने हे कडक उन्हाळ्याचे असणार आहेत त्यामुळे निसर्गकृपेवरच सर्वकाही अवलंबून आहे.
सिंधुदुर्गातील पाटबंधारे प्रकल्पांचा विचार करता यंदाही पाणीसाठा समाधानकारक आहे. 2024 मध्ये 21 फेब्रुवारीपर्यंत 68.99 टक्के पाणीसाठा होता. तर यंदा याच दिवसापर्यंत पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठा 55.92 टक्के आहे. अर्थात यंदा तिलारी या आंतरराज्य प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने जिल्हयाच्या एकूण पाणी साठ्याच्या टक्केवारीत काहीशी घट झाल्याचे दिसते. यंदा तिलारी जलविद्युत प्रकल्पात 44.41 टक्के, तिलारी आंतरराज्य प्रकल्पात 54.03 टक्के, देवघर मध्यम प्रकल्पात 65.91 टक्के, कोर्ले सातंडी 84.26 टक्के, अरुणा 62.69 टक्के, शिवडाव ल.पा. 90.09 टक्के, ओटव 48.59 टक्के, कळसुली देंदोनवाडी 11.43 टक्के, तरंदळे 81.14 टक्के, आडेली 13.74 टक्के, आंबोली 65.80 टक्के, चोरगेवाडी 59.75 टक्के, हातेरी 50.13 टक्के, माडखोल 84.14 टक्के, निळेली 69.32 टक्के, ओरोसबुद्रुक 53.33 टक्के, सनमटेंब 82.01 टक्के, तळेवाडी 77.92 टक्के, दाभाचीवाडी 52.50 टक्के, पावशी 64.22 टक्के, शिरवल 63.64 टक्के, पुळास 87.60 टक्के, वाफोली 12.02 टक्के, कारिवडे 63.10 टक्के, धामापूर 79.52 टक्के, हरकुळ 74.87 टक्के, ओसरगाव 27.26 टक्के, ओझरम 54.26 टक्के, शिरगाव 30.59 टक्के, तिथवली 68.20 टक्के तर लोरे 50.67 टक्के इतका पाणीसाठा आहे.