निवती लाईट हाऊस परिसरात जल सफारीला बंदी  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : निवती लाईट हाऊस परिसरात जल सफारीला बंदी

मालवण बंदर निरीक्षकांचे आदेश; जीवित, वित्तहानी झाल्यास नौकामालक जबाबदार

पुढारी वृत्तसेवा

मालवण : १ सप्टेंबरपासून पर्यटन हंगाम सुरू झाला असून पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 'आय. व्ही. ॲक्ट १९१७' अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रवासी नौका - बोटींमधून निवती लाईट हाऊस व 'म्हातारीची चूळ' परिसरात पर्यटकांना जलसफरीसाठी घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून अपघात किंवा जीवित व वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित नौका मालक आणि चालकाची राहील, असा स्पष्ट इशारा बंदर विभाग प्रशासनाने दिला आहे.

मागील पर्यटन हंगामात मालवण बंदर हद्दीतील निरनिराळ्या ठिकाणांवरून पर्यटकांना बोटीद्वारे निवती लाईट हाऊस परिसरातील खोल समुद्रात नेले जात असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. निवती लाईट हाऊस हे खोल समुद्रात असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे जीवित व वित्तहानी टळावी म्हणून या मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

१२ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन व्यावसायिक, महाराष्ट्र सागरी मंडळ, पोलीस विभाग, वन विभाग आणि कांदळवन विभागाची संयुक्त कार्यशाळा पार पडली होती. या कार्यशाळेदरम्यान जलपर्यटन व्यावसायिकांनी निवती लाईट हाऊस व म्हातारीची चूळ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र असल्याने तिथे बोटी नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. तथापि, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य सर्वेक्षक व सागरी अभियंत्यांनी स्पष्ट केले की, 'आय.व्ही. ॲक्ट १९१७' नुसार नोंदणी झालेल्या नौकांना केवळ 'आय. व्ही. लिमिट'च्या आतच प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असते. निवती लाईट हाऊस हे किनाऱ्यापासून साधारणपणे ५.२९ नॉटिकल मैल अंतरावर असून ते 'आय.व्ही लिमिट'च्या बाहेर येते. त्यामुळे 'आय. व्ही. ॲक्ट 'मधील नौकांना तिथे जाण्यास कायदेशीर बंदी आहे.

निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांची प्रवासी वाहतूक करायची असल्यास, नौकाधारकांनी आपल्या बोटीची नोंदणी 'इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग' यांच्याकडे करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आय. व्ही. ॲक्टअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या बोटींमधून खोल समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणे हा सागरी सुरक्षा नियमांचा व शासकीय नियमांचा गंभीर भंग मानला जाईल. अशी बेकायदेशीर वाहतूक करताना काही अपघात झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास पूर्णपणे संबंधित नौका मालक आणि चालक हेच जबाबदार राहतील, असे बंदर निरीक्षक यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT