वाघबावली येथे दोन वर्षांपूर्वी सापडलेले कातळशिल्प Pudhari Photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : वाघबावली येथील कातळशिल्पावर नवा प्रकाश; थक्क करणारी माहिती आली समोर

Sindhudurg News | भारतीय- मूर्तीशास्त्र आणि स्थापत्य संशोधन परिषदेत रिसर्च पेपर सादर

पुढारी वृत्तसेवा

देवगड : दोन वर्षांपूर्वी देवगड तालुक्यातील साळशी येथे उभ्या लँटराईट जातीच्या दगडावरील काही जंगली प्राण्यांची कातळचित्रे इतिहास संशोधन मंडळाच्या संशोधकांना सापडली होती. तेथून परतत असताना संध्याकाळच्या अंधारात शिरगाव येथील वाघबावली नावाच्या ठिकाणी एक नवे कातळशिल्प सापडले होते. त्याविषयीचा आपला रिसर्च पेपर पुरातत्व अभ्यासक रणजीत हिर्लेकर यांनी भारतीय- मूर्तीशास्त्र आणि स्थापत्य संशोधन परिषदेच्या पाचव्या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय अधिवेशनात सादर केला.

पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भारतीय मूर्तीशास्त्र व स्थापत्य संशोधन परिषदेचे दोन दिवसीय पाचवे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या परिषदेला देशभरातील अनेक राज्यांमधील संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. त्यामध्ये पुरातत्व अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी आपला शोधनिबंध सादर केला. त्यावेळी सत्रप्रमुख म्हणून आर. एच. कुलकर्णी व डेक्कन कॉलेजचे डॉ. श्रीकांत गणवीर हे उपस्थित होते.

हिर्लेकर म्हणाले, शिरगाव येथील कातळशिल्प समतल करण्यासाठी कलाकाराने कोणते साधन वापरले असेल? कसल्याही लोखंडी हत्याराविना असे अचूक कोरीव काम करणे अवघड आहे. हे चित्र काढण्यासाठी माणसाला भूमितीची व गणितीय ज्ञानाची आवश्यकता आहे? त्याविना अशी भौमितिक चित्र कोरणे कसे शक्य व्हावे? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत आपले निष्कर्ष मांडले. या कातळशिल्पाचा कर्ता चांगलाच प्रगत मानव असला पाहिजे. हे कातळशिल्प द्विमीतीय चित्रकलेकडून त्रिमितीय शिल्पकलेच्या दिशेने मानवाचा सुरू असलेला प्रवास अधोरेखित करते. अशात-हेचे वर्तुळ कोरण्यासाठी कलाकाराला भूमितीय गणिताचे ज्ञान आवश्यक आहे. अंक गणिताचीही माहिती असायला हवी. मोजपट्टी वापरण्याचे ज्ञान आवश्यक आहे. अन्यथा इतके मोठे चित्र कोणत्याही साधनाविना, गणिताविना काढणे अशक्य आहे. वाघाच्या आकाराविषयीचे शरीरशास्त्रीय ज्ञान हवे. हे ज्ञान मिळविण्यासाठी तत्कालिन मानवाला आवश्यक ती स्थिरता व समृद्ध जीवन उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या अधिवेशनात आदित्य फडके व प्रा. अरविंद सोनटक्के यांच्या 'सुरसुंदरी देवांगना की नायिका' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी देशभरातील विविध राज्यातून आलेल्या मूर्ती व स्थापत्य कलेतील मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनातील इतिहास अभ्यासकांची पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर महादेव मंदिराच्या अभ्यास दौऱ्याने या परिषदेची सांगता झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT