ना. नितेश राणे   (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg Vijaydurg Fort | सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश

Nitesh Rane statement | सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढणार! पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक ठेवा असलेले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाला आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. छत्रपतींच्या या दोन्ही किल्ल्यांचा ज्वलंत इतिहासाचे जतन करण्यासाठी तसेच किल्ल्यांच्या विकास आणि संवर्धनासाठी आर्थिक ताकद राज्य सरकार देईल. तसेच यामुळे या किल्ल्यांची महती आता जागतिक स्तरावर पोचेल व आंतरराष्ट्रीय पर्यटक सिंधुदुर्गात येतील, यातून सिंधुदुर्गाच्या पर्यटन विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री नितेश राणे बोलत होते. ते म्हणाले, युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जतन होणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. जगभरातील पर्यटक शिवरायांनी उभारलेले किल्ले पाहण्यासाठी सिंधुदुर्गात येणार असून आपली पर्यटनस्थळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहेत.

  • जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव मंजूर

  • विजयदुर्ग व रेडी बंदरे पूर्ण क्षमतेने चालू करणार

  • राजकोट पुतळा परिसर डागडुजी लवकरच पूर्णत्वास

ना. राणे म्हणाले, सिंधुदुर्गातील महावितरणची यंत्रणा दुरुस्तीसाठी 77 कोटींचा नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पैकी महावितरणला 10 कोटी रू. प्राप्त झाले आहेत. या निधीतून जुुने वीज पोल, विद्युत वाहिन्या व ट्रान्स्फॉर्मर बदलण्याची कामे होणार आहेत. चिपी विमानतळासाठी 1 कोटींचा निधी दिला आहे. जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या सार्व. ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मदत होईल. सीवर्ल्ड प्रकल्प स्थानिक आमदार आणि स्थानिक जनता जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत होणार नाही. मात्र अन्य तालुके या प्रकल्पाची मागणी करत आहेत. त्यावर येत्या काळात निर्णय होईल. विजयदुर्ग आणि रेड्डी ही दोन्ही बंदरे पूर्ण क्षमतेने चालू करण्यात येतील, अशी माहिती मंत्री राणे यांनी या वेळी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याचा पश्न मार्गी लागत आहे. यासंबंधात आरोग्य मंत्र्यांशी माझा पाठपुरावा सुरु आहे. राजकोट पुतळा तयार झाला असला तरी याठिकाणीकामे प्रलंबित होती. याबाबत आपण पुतळा बनविणारे अनिल सुतार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी काम हातात घेतले आहे. या पुतळा परिसराची डागडुजी पूर्ण होताच तो कायमस्वरूपी जनतेला खुले केले जाईल, अशी माहिती ना. राणे यांनी दिली.

सभागृहातील भाषणांची धार कमी होईल

राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून सिंधुदुर्गच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. हे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. विरोधकांनाही समजले पाहिजे, तसेच आमच्या मित्र पक्षातील लोकांनाही समजले पाहिजेत. मग सभागृहातील भाषणांची धार कमी होईल, असा टोला ना. राणे यांनी लगावला. मात्र हा टोला नेमका कुणाला? याची चर्चा सुरू होती.

आत्महत्याप्रकरणी कसून चौकशीच्या सूचना

प्रिया चव्हाण व सोनाली गावडे आत्महत्या प्रकरणांची जिल्हा पोलीस अधीक्षकांना कसून चौकशी करावी, अशा सूचना मी त्यांना दिल्या आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वांना न्याय देण्याची माझी भूमिका आहे. या प्रकरणात टीका करणारे ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक आणि माजी खा. विनायक राऊत यांच्यात सुप्त संघर्ष आहे, अशी कोपरखळी त्यांनी मारली. कायदा सर्वांना सारखा आहे. त्यामुळे वरील दोन्ही प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार कारवाई होईल, असेही मंत्री राणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT