कणकवली : सिंधुदुर्गात विजयादशमीचा सण मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. विजयादशमी म्हणजेच सीमोल्लंघन हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, घराघरांत देवपूजा, दुर्गामातेचे पूजन व कुलदेवतेचे पूजन होणार आहे. त्याचबरोबर शस्त्र, वाहन आणि शमी वृक्षाचे पूजनही होणार आहे. आपट्याची पाने एकमेकांना वाटून परंपरेप्रमाणे विजयादशमी साजरी होणार आहे. ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्येही विजयादशमी दिवशी देव विवाह सोहळे परंपरेनुसार होणार आहेत. तर बाजारपेठांमध्येही नवीन वाहन, वस्तू व दागदागिने यांच्या खरेदीसाठी गर्दी होत असून, अनेकांकडून नवीन संकल्प करत सीमोल्लंघन होणार आहे.
सिंधुदुर्गच्या गावागावांत विजयादशमीचा सण पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहाने मंगळवारी साजरा होणार आहे. ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवानिमित्त केलेली घटस्थापना, देवतांची पूजा, श्री दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करून अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन व विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गेले ९ दिवस सुरू आहेत.
विजयादशमीला ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन व सोने लुटणे म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यात येणार आहेत. तत्पूर्वी शमी वृक्षाचे पूजन केले जाणार आहे. ढोल-ताशे व पालखी तरंगासह परंपरागत पद्धतीने हा वार्षिक उत्सव गावागावांत होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात, तर महिला वर्गाकडून ग्रामदेवतांच्या मंदिरात ओटी भरण्यासाठी गर्दी असते. घराघरांतही खंडेनवमीनिमित्त घटस्थापना, शस्त्रपूजन तसेच व्यापारी, व्यावसायिक मंडळींकडूनही आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी पूजन होणार आहे.