सावंतवाडी : वेत्ये येथील श्री. तेंडुलकर यांच्या काळा दगडाच्या खाणीतील अनधिकृत उत्खननाची तक्रार साईप्रसाद कल्याणकर व महेश सावंत यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन नागपूर येथील ईटीएस (ETS) चे अधिकारी बुधवारी खाण तपासणीसाठी आले होते. यावेळी या खाण मालकांनी या अधिकाऱ्यांसमोरच तक्रारदारांना बेदम मारहाण करत त्यांच्या गाडीतच त्यांना डांबून ठेवले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात खाण मालक बाबुराव तेंडोलकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार केल्याच्या रागातून खाण मालक बाबुराव नामदेव तेंडोलकर, खाण मालक सुभाष प्रभाकर राणे व प्रभाकर राणे यांनी तक्रारदारांवर हल्ला चढवला. संशयितांनी श्री. कल्याणकर यांच्या कारवर ठोसे मारून नुकसान केले, तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून घेत तो फोडून टाकला. तर, कल्याणकर यांची गाडी बाहेर पडू नये म्हणून तेंडोलकर यांनी खाणीतील डंपर आडवे लावून रस्ता अडविला.
बेदम मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
खाण मालकांनी महेश सावंत यांना गाडीतून ओढून बाहेर काढले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी खाण मालक तेंडोलकर यांनी मोटरसायकलमधील पेट्रोल काढून "संध्याकाळनंतर थांबलात तर गाडी पेटवून देईन" अशी धमकी दिली. तर सुभाष राणे यांनी दगड उगारून मारण्याचा प्रयत्न केला व राणे पिता-पुत्राने चपलेने मारहाण केली. तेथे उपस्थित पं. स. सदस्य जितेंद्र गावकर व राजकीय पदाधिकारी गुणाजी गावडे यांनी मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
जबरदस्तीने 'बाँड पेपर'वर घेतल्या सह्या '
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीनंतर बाबुराव तेंडोलकर यांनी कोरा बाँड पेपर आणून "यापुढे तक्रार करणार नाही" असे मजकूर लिहून घेऊन तक्रारदारांच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या. या दहशतीच्या वातावरणामुळे तक्रारदार प्रचंड घाबरले होते.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. १ मे २०२६ रोजी कल्याणकर यांनी आपल्याला खाण मालकांकडून धमक्या मिळत असल्याचा अर्ज दिला होता, त्यावर सावंतवाडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे करत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.