वेंगुर्ला: वेंगुर्ला शहरातील विनायक रेसिडेन्सी येथील एका महिलेचे (सुमारे 25 ग्रॅम वजनाचे ) मंगळसूत्र 1 नोव्हेंबर रोजी चोरीस गेले होते. दरम्यान वेंगुर्ला पोलिसांच्या पथकाने संबंधित संशयितास आज (दि. 6) सकाळी 8.15 वाजता सातारा येथून ताब्यात घेतले. त्याला आज वेंगुर्ला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालल्याने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
संतोष वसंत माळकर (वय 43, रा. शिर्डी) असे संबंधित संशयिताचे नाव आहे. विनायक रेसिडेन्सी येथील रहिवासी प्रतिमा प्रकाश जाधव यांनी वेंगुर्ला पोलिसांत मंगळसूत्र चोरीची फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार केवळ 4 दिवसांत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश राठोड, पोलीस हवालदार जयेश सरमळकर, वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर आदीच्या पथकाने संशयितास ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले. याप्रकरणी पोलीस हवालदार भगवान चव्हाण व महिला पोलीस हवालदार दिपा मठकर पुढील तपास करीत आहेत. वेंगुर्ला पोलिसांच्या या कामगिरीचे शहरातून कौतुक होत आहे.