मळगाव : वेंगुर्ले सागर किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील एका ट्रॉलिंग नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाने सोमवारी रात्री कारवाई करत ती नौका ताब्यात घेतली. मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांनी गस्तीदरम्यान ही नौका पकडली. या नौकेसह त्यातील मासळी जप्त करून वेंगुर्ला बंदरात आणण्यात आली.
मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर आणि सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे सोमवारी रात्री समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी कर्नाटक राज्याचा सागरी मासेमारी परवाना असलेली ‘पर्निका-3’ या नावाची नौका वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्यासमोर विनापरवाना मासेमारी करताना आढळली. ही नौका श्रीमती प्रमुक्ता सुनील करकेरा (रा. किडियूर, जि.उडपी) यांच्या मालकीची आहे. या नौकेवर तांडेलसह अन्य 6 खलाशी होते. ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अधिनियम 2021 अंतर्गत करण्यात आली आहे.
मत्स्यव्यवसाय सहा. आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश टेमकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक आणि सागरी सुरक्षा रक्षक यांनी ही यशस्वी मोहीम राबवली. जप्त केलेल्या नौकेवरील मासळीचा लिलाव करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू होती. लिलाव प्रक्रिया पूर्ण करून अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रतिवेदन सादर केल्यानंतर, या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या न्यायालयात होणार आहे.