वैभववाडी तालुका शिंदे शिवसेनेत नाराजी नाट्य! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg ZP Election : वैभववाडी तालुका शिंदे शिवसेनेत नाराजी नाट्य!

तालुका प्रमुखांसह सर्व वीस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये वैभववाडी तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाला जिल्ह्यात झालेल्या भाजप-शिवसेना महायुतीमध्ये कोणतंच स्थान न दिल्याने वैभववाडीतील शिवसेनेच्या सर्व प्रमुख वीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तसे लेखी पत्र संबंधित पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते संजय आंग्रे यांना दिले आहे, अशी माहिती तालुका प्रमुख संभाजी रावराणे व उपजिल्हा प्रमुख विश्राम राणे यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंधुदुर्गमध्ये भाजप शिवसेनेची महायुती ठरली असून इतर सात तालुक्यात शिवसेना पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारीसाठीच्या जागा सोडल्या आहेत. मात्र वैभववाडी तालुक्यात एकही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत सामूहिक राजीनामा सत्र सुरू केले आहे. पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असून हे पक्ष संघटनेला हानिकारक आहे.

लोरे गट व इतर ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात असताना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी विचार न केल्यामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून गेली चार वर्ष कार्यकर्ते पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पक्ष वाढीसाठी अशा प्रकारचे पदाधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र, तालुक्यात शिवसेनेला कोणतेच स्थान न दिल्याने या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT