सिंधुदुर्ग

Sindhudurg News| पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसह हॉटेल व पर्यटन व्यावसायिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन आणि पाणीटंचाईचे संभाव्य संकट टाळण्यासाठी पर्यटकांसह हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे आणि पर्यटन क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने व जबाबदारीने करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमानातील तूट आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील उपलब्ध जलस्रोतांचे जतन करणे, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे, जलक्रीडा, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि कोकणी आतिथ्य यांसाठी देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. आगामी पर्यटन हंगामात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असली, तरी पर्यटनामुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पाणी बचतीचे आवाहन करताना दैनंदिन वापरासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरणे, आंघोळीसाठी शॉवरचा मर्यादित वापर करणे, शक्य असल्यास बादलीचा वापर करून पाण्याची बचत करणे, दात घासताना तसेच दाढी करताना नळ सुरू न ठेवणे, हॉटेलमधील खोल्या व स्वच्छतागृहांमध्ये पिण्याचे पाणी आणि इतर पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे, कपडे व वाहने धुण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. हॉटेल, रिसॉर्ट आणि होम स्टे व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पर्यटकांना चेक-इनच्या वेळी तसेच खोल्यांमध्ये पाणी बचतीबाबत सूचना द्याव्यात. स्वागत कक्ष, भोजन कक्ष आणि स्वच्छतागृहांमध्ये पाणी बचतीचे संदेश प्रदर्शित करावेत. शॉवर, नळ व फ्लश यंत्रणांमधून होणारा अनावश्यक पाण्याचा वापर कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. गळती तातडीने दुरुस्त करावी. तसेच शक्य असेल तेथे पावसाचे पाणी साठवण, सांडपाण्याचे पुनर्वापर आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT