कणकवली : दहशतवाद विरोधी पथक नवी मुंबई, शाखा सिंधुदुर्ग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बुधवारी पहाटे 4 वा. च्या सुमारास दहशतवाद विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कणकवली रेल्वे स्थानकावर तिघांना ताब्यात घेतले.
साथी अतुल माझी (32, रा. सध्या कल्याण, मूळ रा. ढाका बांगला देश) आणि लिझा रहिम शेख (28, सध्या रा. हडपसर पुणे, मूळ रा. ढाका बांगला देश) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या सखोल चौकशीनंतर बुधवारी सायंकाळी उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली.
दहशतवाद विरोधी पथकाचे सिंधुदुर्गचे पोलिस उपनिरीक्षक सखदेव शेवाळे यांनी कणकवलीचे पोलिस नाईक रूपेश गुरव, महिला पो. कॉ. सुप्रिया भागवत, किरण मेथे यांच्या मदतीने कणकवली रेल्वे स्थानकावर त्या बांगला देशी महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचे कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत. त्यामुळे विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 अ, पारपत्र 1950 नियम 3 अ 6 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 7-8 वर्षांपासून त्या महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत. त्यातील साथी माझी या महिलेला मराठी भाषाही येत असल्याचे दिसून आले. त्यांना गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. त्या बांगला देशी महिला कणकवलीत केव्हा आल्या, त्यांचा इकडे येण्याचा उद्देश काय? या सर्व बाबींचा तपास कणकवली पोलिस करीत आहेत.