सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात मंगळवारी भक्तीमय वातावरणात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये साजरा झाला. याच दिवशी जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्ये वार्षिक जत्रोत्सव होते. या जत्रोत्सवांना भाविकांची मोठी गर्दी होती. ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये गावऱ्हाटीप्रमाणे धार्मिक विधी संपन्न झाले. मातीच्या पणत्या पेटवून परंपरेप्रमाणे टिपर पाजळण्यात आला.
त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये विधीवत पूजाअर्चा करून हा उत्सव साजरा केला जातो. मातीच्या पणत्या पेटवून लक्ष लक्ष दिव्यांची रोषणाई करत टिपर पाजळला जातो. दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर पणत्या पेटवून परंपरेप्रमाणे मंदिरांमध्ये रोषणाई केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या तिथीला कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू, कुर्लीची ग्रामदेवता कुर्लादेवी, जामसंडेची ग्रामदेवता दिर्बादेवी-रामेश्वर, केसरीची ग्रामदेवता श्री देव स्वयंभू, कलमठची ग्रामदेवता काशिकलेश्वर, सातार्डा पंचायतन देवस्थान यासह अनेक मंदिरांमध्ये मंगळवारी वार्षिक जत्रोत्सव भक्तीमय वातावरणात पार पडले. या जत्रोत्सवांना त्या त्या भागातील भाविकांनी उपस्थिती दर्शवून ग्रामदेवतांचे दर्शन घेतले.