देवगड ः श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील एका होम स्टेवर गोवा येथून पर्यटक म्हणून आलेल्या माय-लेकाने जीवन संपविल्याची घटना शनिवारी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास उघडकीस आली. सुदेश कृष्णा गावडे (35) व शारदा कृष्णा गावडे (64, दोन्ही रा. गोवा-भालखाजण, पेडणे -कोरगाव, उत्तर गोवा) असे मृतांची नावे आहेत. कुणकेश्वर महाशिवरात्रोत्सवाच्या आदल्या दिवशीच ही घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
गोवा येथील सुदेश गावडे हे अल्टो कारने आई शारदा यांच्यासमवेत शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास कुणकेश्वर येथे आले.रहाण्यासाठी त्यांनी तेथील एका होम स्टेचे बुकींग केले होते. शनिवारी सकाळी 8.30 वा. त्यांची चेक-आऊट होता. मात्र, दुपार झाली तरी ते रुममधून बाहेर आले नाहीत. त्यामुळे होम स्टे मालकाच्या पत्नीने त्यांना रुम बाहेरून आवाज दिला. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने खोलीचा दरवाजाही ठोठावला. मात्र, रुममधून कोणताच प्रतिसाद मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी रुमच्या खिडकीचा पडदा सरकवून आत पाहिले असता सुदेश गावडे व शारदा गावडे या रुममधील बाथरुमच्या बाहेरील छोट्या पॅसेजमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत दिसले.
होम स्टेच्या मालकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुणकेश्वर पोलिस पाटील यांच्यामार्फत देवगड पोलिस स्थानकाला दिली. माहिती मिळताच देवगड पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव, हवालदार महेंद्र महाडिक, महिला पोलिस नाईक प्रतिभा जाधव यांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. खोलीच्या छताला लावलेल्या हुकामध्ये एकच दोरी अडकवून तिच्या दोन्ही टोकाला फास तयार करून त्यांनी गळफास लावून घेतल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. अति. जिल्हा पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. घटनेची खबर होम स्टेच्या मालकाने देवगड पोलिस स्थानकात दिली असून घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, मृत सुदेश गावडे हा अविवाहित असल्याची व तो गोवा येथील एका बँकेत कामाला असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आल्याचे देवगड पोलिसांनी सांगितले. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव व हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.