मालवण :मालवण समुद्रात पर्यटन सफरीसाठी जाणार्या बोटीची एका मच्छीमार बोटीशी समोरासमोर धडक झाली. मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला. यात पर्यटन बोट पलटी झाल्याने बोटीतील सुमारे 40 ते 50 पर्यटक पाण्यात पडले. मात्र परिसरातील स्थानिक मच्छीमारांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आपआपल्या बोटी घटनास्थळी नेत सर्व पर्यटकांचे प्राण वाचविले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात काही पर्यटक किरकोळ जखमी झाल्याचे समजते.
पर्यटन हंगाम सुरू झाल्याने मालवणात पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. मंगळवारी सायंकाळी 30 ते 40 पर्यटकांना घेऊन एक पर्यटन बोट स्कुबा डायव्हिंगसाठी जात होती.
याचवेळी समोरून मच्छीमार बोट आली. दरम्यान दोन्ही बोटींच्या चालकांचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही बोटी समोरासमोर आदळल्या. या धडकेमुळे पर्यटन बोट पाण्यात पलटी झाली. या बोटीत सुमारे 50 पर्यटक होते. ते सर्व समुद्राच्या पाण्यात पडले. पर्यटकांची आरडाओरडा ऐकून स्थानिक मच्छीमारांनी धाव घेत त्यांना पाण्याबाहेर काढले, यामुळे बाका प्रसंग टळला.