ओरोस : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या ‘परख’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्याच्या शैक्षणिक नकाशावर आपले नाव अभिमानाने कोरले आहे. 2024-25 या वर्षासाठी झालेल्या या सर्वेक्षणात, राज्यातील हजारो शाळांना मागे टाकत सिंधुदुर्गने दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले असले तरी, सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांनी भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांसारख्या विषयांमध्ये सरासरीपेक्षा कित्येक पटीने उजवी कामगिरी करून जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा राज्यपातळीवर फडकावला आहे.
हे दैदिप्यमान यश केवळ विद्यार्थ्यांचे नाही, तर त्यामागे शिक्षक, शाळा आणि प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नांची मोठी ताकद आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी घेतलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एनसीईआरटी, महाराष्ट्र यांच्या समन्वयाने राबवलेले विशेष उपक्रम आणि वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, शाळांमध्ये अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि निरीक्षणातून समोर आलेल्या त्रुटींवर तातडीने केलेले काम, यामुळे हे यश मिळाले.
इयत्ता तिसरी : भाषा (81%), गणित (76%), इयत्ता सहावी : भाषा (73%), गणित (59%), परिसर अभ्यास (64%), इयत्ता नववी : भाषा (74%), गणित (43%), विज्ञान (47%), सामाजिक शास्त्र (48%). या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, पायाभूत शिक्षणापासून ते माध्यमिक स्तरापर्यंत विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची, विशेषतः येथील आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ही कामगिरी इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श आणि प्रेरणास्रोत ठरली आहे. या यशाच्या विश्लेषणातून भविष्यात शिक्षक प्रशिक्षण, अभ्यासक्रम सुधारणा आणि शैक्षणिक धोरणे आखण्यासाठी एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. हे यश म्हणजे सिंधुदुर्गच्या शैक्षणिक ज्ञानयज्ञातील एक महत्त्वाचा टप्पा असून, जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरली आहे.
‘परख’ हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी शैक्षणिक कार्यक्रम आहे. याअंतर्गत देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे आणि आकलन क्षमतेचे मूल्यांकन केले जाते. यावर्षी राज्यात 4,314 शाळांमधील तब्बल 1 लाख 23 हजार 659 विद्यार्थ्यांचा या सर्वेक्षणात सहभाग होता. इयत्ता तिसरी, सहावी आणि नववी या तीन महत्त्वाच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयातील समज तपासण्यात आली.