कणकवली ः वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळ्यात बोलताना पालकमंत्री नितेश राणे. सोबत संदेश सावंत, संजना सावंत, समीर नलावडे, बंडू हर्णे, संदीप मेस्त्री, अण्णा कोदे, संदीप सावंत आदी. (छाया ः परेश कांबळी)
* खा. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग विकासाचे जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्णत्वास नेणार
* अजून खूप पल्ला गाठायचाय
कणकवली : आपण ज्या पदावर असतो, त्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम करत आलो आहे. खा. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग विकासाचे जे स्वप्न पाहिले आहे, त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने आपण घेतली आहे. हे सरकार ज्यावेळी आपला कार्यकाळ पूर्ण करेल त्यावेळी म्हणजेच 2029 पर्यंत महाराष्ट्रातील पहिल्या तीन क्रमांकात आपला सिंधुदुर्ग जिल्हा निश्चितपणे असेल, असा विश्वास मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळ्यात व्यक्त केला.
पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्गात विविध सेवाभावी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सोमवारी दिवसभर त्यांनी ओम गणेश निवासस्थानी वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्यावतीने वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. मंत्री नीतेश राणे यांनी केक कापला. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, जि. प. माजी अध्यक्षा संजना सावंत, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, प्रकाश सावंत, संदीप सावंत, सुशील पारकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, शेवटी राजकारणाच्या पलीकडे काही नाती असतात, ती जोडण्याचे काम खा. नारायण राणे यांनी केले आहे आणि त्यांच्या विचारानेच आमचीही वाटचाल सुरू आहे. त्यांनी जोडलेली नाती, संबंध टिकवण्याचे काम त्यांचा मुलगा म्हणून आपण करत आलो आहोत.
ते पुढे म्हणाले, आज महाराष्ट्रात 150 दिवसांपेक्षा जास्त दिवस महायुती सरकारला झाले आहेत. तुम्ही निवडून दिलेला आमदार ज्या मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून काम करत आहे, ते खाते पहिल्या पाच क्रमांकात आहे. हे सर्व तुमच्या प्रेम आणि विश्वासामुळेच आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा तुमच्या सर्वांच्या खांद्यावर सोपवून मी महाराष्ट्रात काम करतो आणि तुम्हीही मला समर्थपणे साथ देत आहात. आता ही केवळ सुरूवात आहे. अजून खूप पल्ला गाठायचा आहे परंतू आपली सुरूवातच दमदार झाली आहे. ते पाहता तुम्ही विचार करा 2029 पर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये काय वातावरण निर्माण करू. शेवटी आपण सर्व खा. नारायण राणे यांचे कार्यकर्ते आहोत. आपण ज्या पदावर बसतो ते पद गदागदा हलवण्याचे काम आपण सर्वजण करत आलो आहोत. पालकमंत्री म्हणून काम करत असताना जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचा आपला ध्यास आहे.
सिंधुदुर्गातील जनतेने दिलेले प्रेम आणि विश्वास तसेच कार्यकर्त्यांचे पाठबळ हीच आपली ताकद असून जनसेवेचे व्रत अखंडपणे जोपासणार असल्याचे ना. राणे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांपैकी कोणा ना कोणाचे वाढदिवस साजरे होत असतात. पुढील काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणूका होवू घातल्या आहेत, मला खात्री आहे पुढील वर्षी ज्यावेळी याठिकाणी माझा वाढदिवस साजरा कराल, त्यावेळी कोणत्या ना कोणत्या पदावर असलेले माझे सहकारी याठिकाणी असतील, असेही मंत्री राणे म्हणाले.
आज आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गपासून रत्नागिरीपर्यंत एक आगळेवेगळे वातावरण पाहायला मिळत आहे. गेली दहा वर्षे माझे सहकारी त्याच उत्साहाने आणि जोमाने माझा वाढदिवस साजरा करतात; पण यावर्षीचा वाढदिवस थोडा वेगळा होता; कारण पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कणकवली झाला आहे. त्यामुळे वेगळे वातावरण पाहायला मिळत आहे, असेही नितेश राणे यांनी बोलून दाखवले.